आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापीठाचे संशोधन महागडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विद्यापीठातून संशोधन करणे अन्य विद्यापीठांच्या तुलनेत फारच महागडे झाले आहे. पीएच.डी.साठी आकारले जाणारे शुल्क शिवाजी विद्यापीठाच्या तुलनेत जवळ-जवळ दुप्पट आहे. पीएच.डी. करणार्‍यांची ही लूट असल्याची भावना काही संशोधकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली.
पीएच.डी.साठी सर्वसाधारण वार्षिक शुल्क आठ हजार 430 आहे, तर नोकरी करणार्‍यांना तब्बल 20 हजार 430 रुपये शुल्क विद्यापीठ प्रशासनाने ठेवले आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात सर्वसाधारणसाठी पाच हजार, तर नोकरदार संशोधकांसाठी 10 हजार शुल्क आहे. तरीही शुल्क माफक असल्याचा दावा सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.
विद्यापीठातील सुविधांचा फारसा लाभ संशोधक विद्यार्थ्यांना होत नाही. ग्रंथालय किंवा प्रयोगशाळेचाही उपयोग होत नाही. कला, ललित कला, भाषा आदी विषयांतील संशोधकांचे कार्य बाहेरील शोधावरच अवलंबून असते.
संगणक व अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधकांचा तर विद्यापीठाशी संबंध फक्त अहवाल किंवा शोधनिबंध सादर करण्यापर्यंतच असतो. बहुतांश सगळ्याच संशोधकाचे काम अशा पद्धतीने विद्यापीठाच्या बाहेरच असते. तरीही इतके जादा शुल्क आकारण्यावर संशोधक विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
संशोधकांना सहा महिन्यांनी संशोधनातील प्रगती अहवाल देणे गरजेचे आहे. ते न दिल्यास 500 रुपये दंड करण्याची तरतूद नियमात आहे. पीएच.डी पूर्ण करण्यासाठी किमान दोन वर्षे एखाद्या संशोधनासाठी लागतातच. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळते. मात्र ती केवळ पहिले दोन वर्षांसाठीच आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनाच शुल्क भरावे लागते.
तुलना नको - शुल्काबाबत शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ यांची तुलना करता कामा नये. सोलापूर विद्यापीठाने अत्यंत वाजवी शुल्क ठेवले आहेत. सर्वांगीण विचार होऊन, परार्मश घेऊनच शुल्क निश्चित केले जाते. विद्यार्थ्यांसाठी तर ती कमीत कमी अशीच आहे.’’ कॅ. डॉ. नितीन सोनजे, कुलसचिव

नोकरदारांना विज्ञान संशोधनासाठी शुल्क
प्रवेश : 100 रुपये
प्रयोगशाळा : 7 हजार
ग्रंथालय : 1 हजार
इंटरनेट : 1 हजार
शैक्षणिक : 10 हजार
प्रयोगशाळा विकास : 1 हजार
जिमखाना, मेडिकल, स्टुडंटस एड फंड, युवक महोत्सव, आपत्कालीन निधी, अश्वमेध फी, विद्यापीठ विकास फंड आदी 330 रुपये. शोधनिबंध तपासणी शुल्क 8 हजार रुपये आहे.