आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशादायी मेळाव्यात सेवानिवृत्त वेतनाची आशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना सेवानिवृत्ती वेतन मिळवून देण्यासंदर्भात शासनाचा सकारात्मक विचार असून त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. हे वेतन मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन, अशी हमी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी या वेळी दिली.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी 12 वाजता मराठा मंदिर सभागृहात अंगणवाडी कर्मचार्‍यांचा आशादायी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषद बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, संघटनेचे सरचिटणीस ब्रजपालसिंग बाधेल, दत्ता गायकवाड, राज्य उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, माधवी शिंदे, सरलाताई चाबुकस्वार, माजी महापौर नलिनी चंदेले, महिला व बालकल्याण समिती सभापती फिरदोस पटेल, नगरसेविका जगदेवी नवले, र्शीदेवी फुलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी काँग्रेस पक्षानेच प्रयत्न केले. तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी उत्तमोत्तम असे कार्य केले आहे. ग्रामीण भागाबरोबर शहराचाही विकास व्हावा यासाठी राजमाता बालक पोषण अभियान राबवले जाणार आहे, असे आश्वासन र्शी. गायकवाड यांनी दिले. असे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या अडचणीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, शासनाकडून मला मिळणार्‍या मानधनात आतापर्यंत वाढ झाली नाही. मात्र, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा पगार दुप्पट झाला आहे. तरीही इतक्या पगारावर संसार चालवणे अवघड आहे. त्यामुळे पगारवाढीबाबत निश्चित विचार करू. भाऊबीजचे मानधन सुद्धा वाढवू, पदोन्नतीच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे, अंगणवाडी सेविकांना निवडणुकीसारखे कुठलेच काम देऊ नये, असे अध्यादेश काढण्यात आले आहे. तसेच महागाई भत्ता, वार्षिक वेतन वाढ, शासकीय सेवेचा दर्जा, पेन्शन आदी मागण्या मान्य करण्यासाठी माझ्यासह आमदार प्रणिती शिंदेसुद्धा प्रयत्नशील असल्याचे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे येणार्‍या पिढीला घडवत आहेत. त्यासाठी त्यांच्या समस्या सोडवणे आमचे आद्यकर्तव्य आहे. हेच देशाचे खरे आधारस्तंभ आहे. म्हणून त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील. काँग्रेस सरकारने महिलेला मंत्रिपदाची जबाबदारी दिली हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. सर्वच ठिकाणी महिलांना 50 टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी प्रयत्नशील आहेत. मंत्रिमंडळातही महिलांना 50 टक्के आरक्षण दिल्यास महिलांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील. महिलांच्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्न करीत आहे, असे मत र्शी शिंदे यांनी व्यक्त केले. अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या आशादायी मेळावा कार्यक्रमाच्या प्रारंभी अंगणवाडी सेविकांनी ‘मुलीचे महत्त्व’, ‘महिलांच्या समस्या’ या विषयावर उत्कृष्टपणे पथनाट्य सादर करण्यात आले. यामध्ये मीनाक्षी कडुसकर, अनिता कांबळे, शशिकला टोणपे, प्रचीती कुलकर्णी, रार्जशी पाटोळे, नंदा पवार, अनिता शिवशेट्टी, स्वाती काकडे, प्रतिभा व्यवहारे, मेळाव्यात जिल्ह्यातील असंख्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गणवेशात उपस्थित होते.

अभियानामुळे मुलींची संख्या वाढली
कुपोषणमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी व मदतनीस यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र 8 टक्के कुपोषणमुक्त झाला. लेक वाचवा अभियानामुळे मुलींची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 872 वरून 917 झाली आहे. त्यांचे काम अतिशय कौतुकास्पद असल्याचे मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.