आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त सरकारी कर्मचा-यांना आरोग्य विमा मिळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सरकारी कर्मचा-यांना निवृत्तीनंतरही विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शेवटच्या वेतनावर आधारित ही सेवा मिळेल. याच वेतनश्रेणीच्या आधारे मिळणा-या निवृत्तीवेतनातून विम्याचे हप्ते भरण्यात येणार आहेत. त्यासाठी तीन गट तयार करण्यात आले.
राजपत्रित अधिकारी ते तृतीय श्रेणीतील निवृत्तांना त्याचा लाभ होईल. चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना मात्र यातून वगळण्यात आले. त्यामुळे सरकारी कर्मचारी संघटनांनी या योजनेचे स्वागत करताना सर्वांनासामावून घेण्याची मागणी केली आहे.

कर्मचा-यांना निवृत्तीनंतर वैद्यकीय खर्चाची रक्कम परत मिळते. त्यानंतर मात्र वैद्यकीय सेवा बंद होते. अशा स्थितीत एखादा गंभीर आजार उद्भवला तर संबंधित कर्मचा-यांसमोर पैशाची अडचण निर्माण होते. प्रसंगी उपचार करणेही अवघड होते. ही बाब लक्षात आल्याने शासनस्तरावर विमा संरक्षण देण्याचा निर्णय झाला.

मंत्रिमंडळाने त्यावर शिक्कामोर्तबही केले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही वैद्यकीय चाचणीची गरज नाही. अस्तित्वातील आजार आणि भविष्यातील आजारांसाठी विम्याचे संरक्षण मिळेल. न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स व युनाटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी सेवा देणार आहे.

तीन वर्षांनी नूतनीकरण
योजनेचा कालावधी 30 जून 2015 पर्यंत आहे. तीन वर्षांनी (30 जून 2017) त्याचे आपोआप नूतनीकरण होईल. प्रत्येक वर्षी निवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांना यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. कॅशलेस उपचारातील अधिकारी, कर्मचारी वार्षिक हप्ता भरून या योजनेत सहभागी होऊ शकतात.

अशी आहे पॉलिसी, असे असतील हप्ते
अ वर्गातील अधिका-यांना 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण आहे. त्यासाठी वार्षिक 9 हजार 400 रुपयांचा हप्ता आहे. 10 ते 20 लाख रुपयांचा विमा उतरवायचा असेल तर अनुक्रमे 13 हजार 500 आणि 20 हजार 800 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.

ब वर्गातील कर्मचा-यांना 3 ते 4 लाख रुपयांचा विमा मिळेल. त्यासाठी 7 हजार 800, 8 हजार 600 आणि 9 हजार 400 रुपयांचा हप्ता आहे.

क वर्गातील कर्मचा-यांना 1 ते 3 लाख रुपयांचा विमा असून, त्यासाठी 6 हजार, 6 हजार 900, 7 हजार 800 हप्ता असणार आहे. आगाऊ हप्ता भरण्यासाठी कर्मचा-यांना अग्रीम देण्याची सुविधाही आहे.