आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूलदिनी कर्मचारी संपावर, तरीही मंत्र्यांच्या हस्ते गौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शासनाच्या वतीने गतिमान व पारदर्शी कारभाराचा मूलमंत्र प्रशासनात रुजवण्यासाठी ‘महसूल दिन’ साजरा केला जातो. 1 ऑगस्ट रोजी राज्यभर महसूल दिन साजरा झाला खरा, परंतु विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर असल्याने जिल्हा कचेरीतील कार्यालये ओस होती. विशेष म्हणजे, शुक्रवारी सायंकाळी पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते सुमारे 500 कर्मचार्‍यांचा गौरव झाला. पण कर्मचार्‍यांच्या संपामुळे नागरिकांची हेळसांड झाली याबद्दल सर्वजण मूकच राहिले.

मागण्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार
जिल्हाधिकारी कार्यालयावरच जिल्ह्याचा कारभार चालतो. जिल्हाधिकारी प्रमुख असल्याने जिल्ह्यातील सर्व समस्यांच्या तक्रारी त्यांच्याकडेच येणे साहजिक आहे. मात्र, या कार्यालयाकडील उपलब्ध कर्मचार्‍यांची संख्या व त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदार्‍या पाहता कर्मचार्‍यांची संख्या वाढवणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी मांडलेल्या सर्व मागण्या मी मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार आहे. त्यांच्याच खात्याचे सचिव स्वाधिन क्षत्रिय हे आता राज्याचे मुख्य सचिव झाल्याने त्या मागण्या पूर्ण होतील, असा विश्वास पालकमंत्री दिलीप सोपल यांनी व्यक्त केला.
शिवछपत्रपती रंगभवन येथे महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर कुलगुरू एन. एन. मालदार, पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस अधीक्षक मकरंद रानडे, जिल्हा परिषदेचे सीईओ सुरेश काकाणी, अप्पर जिल्हाधिकारी रमेश चव्हाण, मुद्रांक जिल्हाधिकारी मंजूषा मिस्कर, प्रांताधिकारी मनिषा कुंभार, ज्योती पाटील, शहाजी पवार, कर्मचारी संघटनेचे प्रवीण शिरसीकर, अ.रजाक मकानदार, दिलावर वाघमारे आदी उपस्थित होते. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी प्रास्ताविकामध्ये गेल्या वर्षभरात केलेल्या कामांची उजळणी केली.
पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते आषाढी वारीमध्ये काम केलेल्या बांधकाम विभाग, महावितरण, नगरपालिका, पोलिस अधिकारी, मंदिर समिती, आरोग्य विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, उपजिल्हाधिकारी ते कोतवालापर्यंतच्या 500 कर्मचार्‍यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुर्शी गाडगीळ यांनी केले तर आभार प्रांताधिकारी र्शीमंत पाटोळे यांनी मानले.