आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Road Accident On Solapur Hydrabad Road. Six Dead

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर दिंडीत कार घुसल्याने सहा वारकरी ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर-हैदराबाद महामार्गावर रस्त्याच्या कडेला विठू नामाचा गजर करणाºया सिंदगाव (ता. तुळजापूर) येथील दिंडीत भरधाव वेगातील कार घुसल्याने सहा वारकरी ठार तर 18 जण जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन महिला वारकºयांचा समावेश असून जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोचना रणशूर जाधव (42, रा. शहापूर), श्रीधर श्रीपतराव ताडकर (36, सिंदगाव), जयश्री देविदास बणजगोळे (50, रा. सिंदगाव), सोनाबाई ऊर्फ कुसुम गोविंद गुरव (50, वागदरी), देविदास दत्तात्रय बणजगोळे (55, रा. सिंदगाव), उद्धव काशिनाथ पाटील ऊर्फ बणजगोळे (37, रा. सिंदगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत.


एकच गोंधळ अन् आक्रोश
सिंदगाव येथील जय हनुमान भजनी मंडळातर्फे माघी यात्रा दिंडी काढण्यात येते. या दिंडीत 152 पुरुष-महिला वारकरी सहभागी आहेत. 14 तारखेला दिंडीने प्रस्थान केले होते. शुक्रवारी सोलापूरपासून जवळ असलेल्या चाकोते पेट्रोल पंपाजवळील यादव यांच्या शेताजवळ दिंडी मुक्कामी होती. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास सर्व वारकरी तयार होऊन रस्त्याच्या कडेला भजन करत थांबले होते. पुढे टाळकरी, मध्ये पताके, देवाचा रथ, झेंडेकरी, त्या मागे महिला होत्या. याचवेळी सोलापूरच्या दिशेने भरधाव निघालेली कार (एमएच 04, डीआर - 1043) काही कळायच्या आतच रांगेत मागे थांबलेल्या वारक-यांना धडकली अन् एकच गोंधळ, आक्रोश सुरू झाला. काही अंतरावर जाऊन कार खड्ड्यात उलटली, तर काही वारकरी पंधरा ते वीस फूट खोल खड्ड्यात पडले. कारने ठोकरल्यानंतर सोनाबाई गुरव या उंच हवेत उडून पुन्हा कारच्या चालक सीटवर आदळल्या. हे दृश्य इतके भयावह होते की, त्यांचे डोके व पोट कारमध्ये तर पाय बोनेटवर अशा स्थितीत त्या पडल्या होत्या. जयश्री, सोनाबाई, देविदास, उद्धव यांचा जागीच मृत्यू झाला.

मदतीसाठी धावून आले गावकरी

अपघातानंतर वारक-यांनी पोलिसांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, मात्र, 40 मिनिटापर्यंत कोणीच फिरकले नाही. मुळेगाव तांड्यावरील नागरिकच मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी जखमींना रस्त्याच्या एका कडेला आणले. गावक-यांनीही पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, त्यांचा पत्ताच नव्हता. वैतागलेल्या वारक-यांनी आपल्या टेम्पोमधील सर्व साहित्य काढून त्यातून मृत आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.

वारक-यांच्या तक्रारी
> रस्त्यावर वीज, दिवे नाहीत.
> हेल्पलाइनचे क्रमांक असलेले फलक नाहीत.
> पोलिसांची मदत तत्काळ मिळाली नाही.
> रस्त्यावर पाहिजे त्या ठिकाणी गतिरोधक नाही.

चालकाला अटक
अपघातास जबाबदार असलेला कारचालक प्रमोद भीमराव पाटील (रा. मुंबई) याला सोलापूर तालुका पोलिसांनी अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर जामीन मंजूर झाला. पाटील हा कार घेऊन मुंबईकडे जात होता. कारवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे त्याने सांगितले.

असा होता कार्यक्रम
14 ते 22 फेब्रुवारी यादरम्यान दिंडीचा प्रवास आहे. शुक्रवारी नवीन हैदराबाद नाक्याजवळ, शानिवारी शिंगोली, रविवारी कुरुल, सोमवारी टाकळी, मंगळवारी पंढरपुरात पोहोचणार आहेत. अपघातानंतर दिंडीच्या प्रस्थानाला थोडासा उशीर झाला. दुपारच्या सुमारास दिंडी सोलापुरात आली.

वारक-यांना धीर
अपघातानंतर वारकरी घाबरलेल्या अवस्थेत होते. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस अधीक्षक राजेश प्रधान यांनी शासकीय रुग्णालयास भेट दिली. गेडाम यांनी वैद्यकीय अधिका-यांना तातडीने उपचार करण्याची सूचना दिली. त्यानंतर या दोन्ही अधिका-यांनी वारक-यांना धीर दिला.