आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदाचाही पावसाळा खड्डय़ांतूनच, रस्ते प्रकल्पाचे काम रखडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरात 238 कोटी रुपयांचे 82 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होतील. मात्र, महापालिकेकडून टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने कामाला उशीर झालेला असेल. पावसाळ्यात कामे करता येणार नाही, त्यामुळे नियोजित 41 रस्त्यांची कामे सप्टेंबरमध्ये सुरू होतील. परिणामी शहरवासीयांना यंदाच्या पावसाळ्यातही खड्डय़ांतूनच वाट काढत जावे लागणार आहे.
शासनाकडून पहिल्या टप्यातील 23 कोटी 47 लाख रुपयांचे अनुदान महापालिकेस प्राप्त झाले. अन्य रक्कम काम सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. एप्रिल 2012 अखेर टेंडर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असताना महापालिकेने अद्याप ती पूर्ण केली नाही. जूनअखेर ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व कामात रस्त्यांची दुरुस्ती केली नाही. बुधवार बाजार, मंगळवार बाजार, जुळे सोलापूरसह बहुतेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे असल्याने पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार आहे. महापालिका निवडणुकीत विकासाच्या गप्पा मारणारी मंडळी सत्तेत्त आल्यानंतर मात्र शांत झाली आहेत.
.. तर पेट्रोल स्वस्त झाले असते
238 कोटी रुपयांपैकी शासनाकडून 50 टक्के अनुदान मिळणार आहे, तर महापालिका 50 टक्के रक्कम कर्ज काढून भरणार आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी शहरातील पेट्रोल आणि डिझेलवर अधिभार लावण्यात आले आहेत. हा अधिभार नसता तर शहरवासीयांना लिटरमागे एक रुपये वीस पैसे कमी मोजावे लागले असते. शिवाय, सब रजिस्टर कार्यालयातील खरेदी-विक्रीवर एक टक्के हस्तांतर शुल्क वसूल करण्यात येत आहे.
तीन मक्तेदारांकडून टेंडर
या कामासाठी वार्षिक 350 कोटींची उलाढाल असलेल्या कंपन्यांस मक्ता देण्यात येणार आहे. मुंबईच्या तीन कंपन्या टेंडर प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत. सोलापुरात 350 कोटींपेक्षा अधीक उलाढाल असलेली एकही कंपनी नाही. युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर कन्ट्रक्शन लि. मुंबई, वलेचा इंजिनिअरिंग लि. मुंबई आणि नागर्जुन कन्ट्रक्शन मुंबई या तीन कंपन्या तांत्रिक बाबीत बसत असल्याने 238 कोटींचे काम करण्यास पात्र ठरले आहेत. यापैकी ज्या कंपनीचे दर कमी असेल त्यांना काम मिळण्याची शक्यता आहे.