आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धूळफेक : रस्ते कामाचा घोळ, लुटण्याचा मेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रभाग क्रमांक ४८ मधील रस्त्यांचे खडीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामाला नुकतीच मंजुरी देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे दोन-अडीच वर्षांपूर्वीच या रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे. आता त्याच रस्त्यावर खडीकरण काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. दुसरीकडे नव्याने करण्यात येणार्‍या यातील काही रस्ते कामाबाबत चौकशीचे आदेश तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिले होते. त्यांची बदली झाल्यानंतर चौकशी थांबली.चांगले रस्ते पुन्हा करण्याचा प्रकार म्हणजे मनपा अधिकार्‍यांनी केलेली धूळफेकच आहे. मलिदा लाटण्यासाठी होणार्‍या या प्रकारावर ‘डीबी स्टार’ने टाकलेला हा प्रकाश...

रस्त्यांची सध्याची स्थिती
रस्त्याची माहिती कळताच ‘दिव्य मराठी’च्या चमूने त्या त्या परिसरातील कार्यकर्त्यांसोबत गुरुवारी सर्व नऊ रस्त्यांची पाहणी केली. अत्तार नगर येथे सर्व रस्ते विधानसभा निवडणुकीदरम्यान झाले. इथे एकही रस्ता करण्यासारखा दिसून आला नाही. नम्रता सोसायटी येथेही अशीच परिस्थिती आहे. सिमला नगरमध्ये एक मोठा रस्ता पूर्वीच डांबरीकरण झाला आहे. त्यातील २० टक्के भागावर पंधरा दिवसांपूर्वी खडीकरण करण्यात आले आहे. टेंडरमध्ये सुचविल्याप्रमाणे खडीचा रस्ता करण्यात आला नाही. सिमला अपार्टमेंटसमोर रस्ता खडीकरण करण्यात आले आहे. मंत्री-चंडक रेसिडन्सी येथे १२ एप्रिल रोजी एकाच दिवसात फक्त खडी टाकण्यात आली. या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही.

द्वारका नगरात सर्व ठिकाणी डांबरी रस्ते झाले आहेत. एका ठिकाणी पूर्वीचा जुना डांबरी रस्ता होता. तेथे ड्रेनेज लाइन टाकल्यामुळे त्याची खोदाई झाली आणि मातीचे सपाटीकरणही झाले. येथे खडीचा रस्ता करणे गरजेचे आहे. परंतु या परिसरात अद्याप एक अंशही खडी पडली नाही. वैष्णवी नगरचा रस्ता चकाचक आहे. तेथे एकही रस्ता करायचा शिल्लक नसताना तेथे खडीचा रस्ता सुचवण्यात आला आहे. वैष्णवीनगरअंतर्गत रस्त्याचे काम होणे बाकी आहेत.परंतु रस्त्याच्या कामासाठी या परिसरात कुठेच खडी किंवा मुरूम टाकलेले दिसून आले नाही. या रस्ते कामाचा अद्यापही श्रीगणेशा झाला नाही.

कामाबाबत काही प्रश्न
झोनमधून बिलांचे रजिस्टर का दाखविले जात नाही
रस्ते झालेले असताना पुन्हा नवा अहवाल कसा
झोन अधिकारी, नगर अभियंता यांनी मंजुरी कशी
बजेट अभिप्रायनंतर जीईने प्रत्यक्षात पाहणी केली का

रस्ते कामाची वर्क ऑर्डर निघाली
1. नऊ रस्त्यांसह इतरही रस्ते कामाचे प्रसिद्धीकरण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले.
2. या कामाचे फॉर्म ते १९ जानेवारी दरम्यान देण्यात आले. बयाणा रक्कम मुख्य लेखापाल कार्यालयात २१ जानेवारीपर्यंत मागविण्यात आली.
3. सीलबंद टेंडर २३ जानेवारीपर्यंत स्वीकारण्यात आले. याला झोन अधिकारी आणि नगरअभियंता यांची अंतिम मंजुरी मिळविल्यानंतर ऑडिट अभिप्राय मागविण्यात आला.
4. अभिप्रायसह १६ मार्च रोजी झोनकडे पाठवून देण्यात आला. त्यानंतर ते दिवसात या कामांची वर्कऑर्डर देण्यात आली. या कामाला ४५ दिवसांची मुदत देण्यात आली.
5. वर्क ऑर्डर निघून निम्मा कालावधी संपला आहे. मात्र अद्याप काही रस्त्यांच्या कामाची सुरुवातही झाली नाही. उर्वरित दिवसात कामे उरकण्याची शक्यता नाकारता येत नाही. कागदपत्री काम पूर्ण झाल्याचीही नोंद यावेळी होऊ शकते.

अशी होती प्रक्रिया
पाचलाखांच्या आतील कामे झोन अधिकार्‍यांच्या अधिकारात असतात. वरील नऊ रस्त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर बजेट अभिप्राय घेतला जातो. यानंतर झोनचे जीई त्या रस्त्यांच्या ठिकाणाची पाहणी करतात. रस्त्याची गरज आहे का, याचा अहवाल ते झोन अधिकारी यांना देतात. आणि इन्स्टीमेंट तयार होते. यावर झोन अधिकारी, प्रभाग समिती आणि सिटी इंजिनिअरची मंजुरी घेतली जाते. सर्व मंजुरी मिळाल्यानंतर टेंडर काढून ऑडिट विभागाचा अभिप्राय घेतला जातो. अभिप्राय घेतल्यानंतर वर्क ऑर्डर दिली जाते. ही प्रक्रिया फक्त कागदोपत्री करण्यात आली.

झोन अधिकार्‍यांची टाळाटाळ
याविषयाबद्दल माहिती घेण्यासाठी झोन अधिकारी मठपती, अवेक्षक डोंगरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दोघांकडूनही आज- उद्या म्हणत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

मलिदा लाटण्याचा प्रकार
मुख्यमंत्री विशेष निधीतून प्रभाग ४८ अंतर्गत येणार्‍या अत्तार नगरातील बहुतेक रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहेत. आता नव्याने या नगरात खडीकरणास मंजुरी मिळाली आहे. महापालिका आता खडीचा रस्ता कुठे करणार हा प्रश्न आहे. अशा चुकीच्या आणि मलिदा लाटणार्‍या कामाकडे आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावे. प्रभाकरजामगुंडे, माजी नगरसेवक

रस्त्यांची पाहणी करणार
महापालिकेनेमंजुरी देण्यात आलेल्या त्या रस्त्यांची फाईल उद्याच मागवतो. गरजेनुसार प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करू. या रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार होत असेल तर चुकीचे आहे. अशामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. या प्रकरणात कुणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. श्रीकांतम्याकलवार, उपायुक्त, महापालिका

रस्ते कामासाठी मंजूर निधी (प्रभागक्र. ४८ अंतर्गत २८,२४,८८३ मंजुरी)
२,२८,२३७ - म्हाडा मनमित अपार्टमेंट कॉँक्रिट रस्ता करणे
१,८२,२२१ - द्वारका नगररात खडीचा रस्ता करणे
२,७३,३३१ - सिमला नगरात खडीचा रस्ता करणे
२,७३,३३१ - सिमला अपार्टमेंट रस्ता खडीकरण
३,१८,८८६ - वैष्णवी नगरात खडीचा रस्ता करणे
४,५५,५५२ - मंत्रीचंडक रेसीडन्सी येथे खडीचा रस्ता
४,५५,५५२ - नम्रता सोसायटी येथे खडीचा रस्ता करणे
४,५५,५५२ - अत्तार नगर येथे खडीचा रस्ता करणे
१,८२,२२१ वैष्णवी नगराअंतर्गत रस्ते खडीकरण करणे