आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यम पावसाने रस्त्यांत साचले तळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरात नालेसफाई झालीच नाही. अधिकारी काम झाल्याचा आव आणत आहेत. न झालेल्या कामाची बिले मागील वर्षाचे फोटो लावून काढत आहेत, असा आरोप विरोधी पक्षातील नगरसेवकांनी केला. सत्ताधारी नगरसेवकांनीही त्याला साथ दिली. मेन्टेनन्सची कामे झोन समितीत मंजूर झाल्याशिवाय देऊ नका, असे मत सभागृह नेते महेश कोठे यांनी व्यक्त केले.

आठ झोन अधिकार्‍यांना सभागृहात बोलून महापौर अलका राठोड यांनी जाब विचारला. नाल्याची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात नाले सफाई न झाल्यामुळे सोमवारच्या पावसाचा फटका बसला. ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मागील 25 घरांत आणि मौलाली चौकातील घरांमध्ये पाणी शिरले. गणेश पेठ, कुंभार वेस नाल्यातून गाळ काढला नाही. आयुक्तांनी नाले सफाईच्या बैठका घेऊन काहीच उपयोग झाला नाही. झोन कार्यालयांकडून काहीच कामे झाली नाहीत, असे आरोप झाले.

नगरसेवक जगदीश पाटील, आनंद चंदनशिवे, नागेश वल्याळ, चंद्रकांत रमणशेट्टी, अविनाश पाटील, मेघनाथ येमूल, उदय चाकोते, अनिल पल्ली, सुरेश पाटील, सुनीता भोसले, खैरून्नीसा शेख यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. या वेळी झोनच्या आठ अधिकार्‍यांना सभागृहात बोलवले होते. झोन दोनचे अधिकारी अतुल भालेराव यांनी हनुमान नगर, रमाबाई आंबेडकर, विडी घरकुल, दहिटणे येथे काम केल्याचे सांगितले. त्यांनी लाख रुपये घेतल्याचे लेखापाल सुकेश गोडगे यांनी सांगितले. भालेराव बोगस बिल काढतात, असा आरोप नगरसेवक सुरेश पाटील यांनी केला.

नालेसफाईचे कामे झाले नसल्यास त्यांची पाहणी करू, असे आश्वासन महापौर राठोड यांनी सभागृहात दिले.

तयार होण्यापूर्वीच अडीच किलोमीटरचा रस्ता गेला वाहून
सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत कुंभारी जकात नाका ते सत्तर फूट चौकापर्यंत सुमारे दोन ते अडीच किलोमीटरचा एक मुख्य रस्ता तयार केला जात आहे. अनेक वर्षांपासून पदाधिकारी आणि अधिकार्‍यांकडून या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळाला. रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूने खडी आणि दुसर्‍या बाजूने मुरूम टाकण्यात आले आहे. पावसामुळे खडी टिकली आणि मुरूम काही प्रमाणात वाहून गेले. हे काम पावसाळ्यापूर्वी सुरू झाले असते तर हे चित्र पाहावयास मिळाले नसते.

खेळ महापालिका सभेचा
पुनर्डांबरीकरण करण्यासाठी सात कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामाच्या मंजुरीसाठी महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे पाठवून दिला. परंतु, महापालिका सभेने त्या प्रस्तावाला बगल देत ज्या मक्तेदाराने हे काम केले त्याच्याकडूनच दुरुस्त करून घेण्याचा निर्णय घ्ेातला. यानंतर हा विषय धूळखात पडला. सभेमध्ये फक्त निर्णय घेणे आणि त्याकडे नंतर दुर्लक्ष करणे हे सभेचे वैशिष्ट्य बनले आहे.

महापालिकेला नाही गांभीर्य
रस्त्यावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्याच्या कडेने सांडपाण्याची नाली तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी जागोजागी छिद्र करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी त्या छिद्रातील माती काढणे अत्यावश्यक होते. फक्त हिराचंद नेमचंद प्रशालेसमोरील माती काढून महापालिकेने शहरातील सर्व प्रमुख रस्त्याच्या कडेची माती काढल्याचा बाऊ केला. सोमवारी 28.4 मिलिमीटर पाऊस आला आणि या सगळ्या रस्त्यावर पाणी साचून तळे निर्माण झाले. मंगळवारी रस्त्याच्या कडेला साचलेली माती काढण्यात आली नाही. पांजरापोळ चौक, कोंतम चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक आदी भागात उतार असल्यामुळे पाणी वेगाने येते. नाले आणि ड्रेनेज लाइन व्यवस्थित स्वच्छ न केल्यामुळे पाण्याचा प्रवाह लवकर कमी होत नाही.