आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी एफएम, एसएमएसने करणार अपडेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- घरातून बाहेर पडल्यानंतर वाहतूक कोंडी, रस्त्याची कामे सुरू असल्यामुळे होणारा त्रास हे सोलापूरकरांना नवीन नाही. पण या त्रासातून सुटका करण्यासाठी वाहतूक शाखेने अभिनव योजना आखली आहे. एफएम आणि एसएमएसद्वारे लोकांपर्यंत वाहतूक संबंधीची ताजी स्थिती कळवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना मोबाइल आणि रेडिओच्या माध्यमातून घरबसल्या आणि प्रवासात कुठेही वाहतुकीची ताजी माहिती मिळणार आहे. यामुळे प्रवासही सुखकर होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

सोलापूरची लोकसंख्या बारा लाखांच्या घरात आहे. वाहनांची संख्या सहा लाखांपर्यंत पोहोचली आहे. यात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी या वाहनांचा समावेश आहे. विजापूर, हैदराबाद, पुणे हे राष्ट्रीय महामार्ग शहरातून जातात. होटगी रस्ता, विजापूर रस्ता, पुणे, तुळजापूर, कोंतम चौक, बाळीवेस, मधला मारुती, शिवाजी चौक, रेल्वे स्टेशन, मार्केट यार्ड, वालचंद कॉलेज, दयानंद कॉलेज, सातरस्ता या भागात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अवजड वाहनेही धावतात. अपघातांचे प्रमाणही मोठे आहे. नेहमी सिग्नल चौकातही कोंडी असते. या सर्व बाबींचा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून वाहतूक शाखेने ही योजना आखली आहे.
‘एकेरी’बाबतही नियोजन
एकेरी मार्गाबाबत नियोजन सुरू करण्यात येणार आहे. नव्याने चौकांचा आढावा, वाहनांची संख्या, रस्त्यांची स्थिती पाहून एकेरी मार्गाबाबत नियोजन होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात वाहतूक पोलिस अधिकारी, कर्मचारी, नागरिक, वाहतूक सल्लागार समिती, मान्यवर नागरिक, महिला, वृत्तपत्र प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन वाहतूक समस्या व उपाय याबबात चर्चा होणार आहे.