आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर पोलिसांची कमाल, ३६ तासांत सराफ लूटमारीचा छडा लावला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कुमठे(ता. उत्तर सोलापूर) येथील सराफाच्या हातातून २० तोळे सोने ठेवलेली बॅग हिसकावून नेणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने ३६ तासांत अटक केली. त्यांच्याकडून सहा लाखांचे दागिने, चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सर्व आरोपी पंचविशीच्या आतील आहेत. एक कुमठ्याचा आहे तर सात लोधी गल्लीतील आहेत.

या प्रकरणी सुजाता नागराज वेर्णेकर (वय- रा. कुमठे) यांनी फिर्याद दिली होती. वेर्णेकर यांचे गावातच सत्यनारायण ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. बुधवारी (दि.१५) रात्री ७.४५ च्या सुमाराला दुकान बंद करून त्या आणि त्यांचा मुलगा सचिन घराकडे निघाले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद करताना सोन्याचे दागिने रोख रक्कम एका बॅगेत घेतली होती. घराकडे जाताना मोटरसायकलवरून दोन चोरटे आले. त्यांना मारहाण करून त्यांच्या हातातील बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली. वेर्णेकरांनी तत्काळ विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले. यावेळी त्यांनी बॅगेत २० तोळे सोने असल्याची फिर्याद दिली होती. पोलिसांनी आरोपींबाबत प्राथमिक माहिती घेऊन तपासाला सुरुवात केली.

यांनी पकडले आरोपींना
ही कामगिरी पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, पोलिस उपायुक्त नीलेश अष्टेकर, साहाय्यक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, साहाय्यक पोलिस निरीक्षक गोविंद आदटराव, डी. एस. देसाई, साहाय्यक फौजदार कमलाकर माने, हवालदार हारुन पटेल, सुराज मुलाणी, मुन्ना शेख, रामदास गायकवाड, गणेश शिर्के, सागर सरतापे, काळवले यांनी पार पाडली.

चार मोटारसायकली हस्तगत
राहुल उधयसिंग दवेवाले (वय २३, रा. लोधी गल्ली), बबलू हुसेन शेख (वय २०, रा. कुमठेगाव), गणेश रामसिंग मदनावाले (वय २५, रा. लोधी गल्ली), धनंजय सीताराम शिवसिंगवाले (वय २४, रा. लोधी गल्ली), करण प्रताप जमादार (वय २५, रा. लोधी गल्ली), मुकेश उर्फ ओट्या भीमसिंग सतारवाले (वय २४, रा. लोधी गल्ली), गंगा ऊर्फ गंग्या किसनसिंग बोधीवाले (वय २३, रा. लोधी गल्ली), गजराज सितलसिंग हजारीवाले (वय २१, रा. लोधी गल्ली) या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील मुकेश आणि गंगा हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.

पहिला चोर कुमठ्यात पकडला
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी गुरुवारी बबलू शेख या चोरट्याला कुमठे गावातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून इतर आरोपींची माहिती मिळाली. राहुल दवेवाले या चोरट्याच्या घरात २९ तोळे दागिने सापडले. इतर आरोपींना ताब्यात घेतले.

पुढे वाचा, ३६ मिनिटांत मंगळसूत्र चोरट्यांना ताब्यात घेतले