आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांचा कहर: जीप घेण्याच्या स्वप्नावर चोरट्यांनी पाणी फेरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पती खासगी जीपवर चालक. स्वत:ची जीप घेऊन संसार सुखाचा करण्यासाठी पत्नीने आईकडून हातउसने दोन लाख रुपये आणले होते. घरात पैसे आणून ठेवल्यावर घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दोन लाख रुपये, एक तोळ्याचे सोन्याचे गंठण, दोन तोळे चांदीचे पैंजण असा ऐवज पळवला. अक्कलकोट रस्ता साईबाबा नगरात हा प्रकार घडला. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास तो उघडकीस आला. या घटनेमुळे शिंदे दांपत्याचे जीप घेण्याचे स्वप्न भंगले आहे.

सुप्रिया संभाजी शिंदे (वय 24, रा. साईबाबा नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुप्रियाचे पती संभाजी हे खासगी जीपवर चालक म्हणून काम करतात. आई बाळीवेस परिसरात भाजी विकते. गरिबीतूनही आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा, यासाठी त्यांनी मदत केली होती.

सुप्रिया बाळीवेसमधील आईच्या घरी मंगळवारी रात्री गेल्या. पती जीप घेऊन बाहेरगावी गेले होते. बुधवारी सकाळी घरी आल्यानंतर सुप्रियाला मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटल्याचे दिसले. कपाटातील दोन लाख रुपये आणि दागिने पळवण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्या गांगरून गेल्या. पोलिसांना घटनेची माहिती देताच साहाय्यक पोलिस आयुक्त धनराज चव्हाण, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सोनकवडे, अनिल बेणके, गुन्हे शाखेचे साहाय्यक निरीक्षक दिलीप पाटील यांनी भेट देऊन घराची पाहणी केली. तपासाच्या दृष्टीने काही माहिती जाणून घेतली.

सराईत गुन्हेगाराचे कृत्य
"कुणीतरी पाळत ठेवून ही चोरी केली असावी. कडीकोयंडा पक्कडच्या साह्याने तोडला आहे. सराईत गुन्हेगारांचे हे कृत्य असल्याचे दिसून येते. त्यादृष्टीने तपास सुरू आहे."
-अनिल बेणके, पोलिस निरीक्षक (गुन्हे), एमआयडीसी

चोर्‍या वाढतच आहेत
नवीन वर्षातही शहरातील चोर्‍यांचे सत्र सुरूच आहे. चोरी झाली नाही असा एकही दिवस गेलेला नाही. मंगळसूत्र हिसकावणे, सराफ दुकान फोडणे, घरफोडी, चोरी, दुचाकी चोरी या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. सुमारे पंचवीसहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तपास नगण्य आहे. पोलिसांचा धाक चोरांवर राहिला नसल्याचे आतापर्यंतच्या घटनांवरून दिसून येते.