आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंगीचे औषध देऊन रेल्वेत तरुणीची लूट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- वेळ सोमवारी पहाटे साडेपाचची. स्थळ सोलापूर रेल्वेस्थानक. कोईम्बतूर-कुर्ला एक्स्प्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावर थांबा घेऊन मुंबईकडे मार्गस्थ होते. फलाटावर उरते ती केवळ शांतता. मात्र, या शांततेला छेद देणार्‍या एका तरुणीच्या रडण्याचा आवाज कानी येतो आणि स्थानकावरील कर्मचारी स्तब्ध होतात. शेजारी बसलेल्या जोडप्याने गुंगीचे औषध देऊन रोख 15 हजार रुपयांसह तिची बॅग पळवलेली असते.

कोईम्बतूर -कुर्ला व्हाया बंगळुरू एक्स्प्रेसने शबाना खान (वय 20) ही आजारी आईला पाहण्यासाठी बंगळुरूहून गाडीत चढली. तिला चालू तिकीट काढून महिला डब्यात प्रवेश करावा लागला. बंगळुरू ते वाडीदरम्यान शेजारी बसलेल्या महिलेने व तिच्या पतीने शबानाशी ओळख वाढविली. बोलता बोलता तिला दहिभात खाण्यास दिला. दहिभात खाताच 4 ते 5 मिनिटांत शबाना झोपी गेली. जाग आल्यानंतर पाहते तर तिच्याकडील सर्व साहित्य लंपास झालेले असते. संकटाचा डोंगर म्हणजे काय याची अनुभूती तिला त्या वेळी आली.

घटनेचे गांभीर्य कळताच स्थानकावरील कर्मचार्‍यांनी तिला प्यायला पाणी दिले. त्यानंतर तक्रार देण्यासाठी तिच्या सोबत लोहमार्ग पोलिसांकडे गेले. बॅग चोरीला गेल्याची घटना शबाना रडत रडत पोलिसांना सांगत होती. तक्रार दिली पण पुढे काय, असा प्रश्न तिच्या समोर उभा होता. त्यावेळी सकाळचे नऊ वाजलेले. पोटात अन्नाचा कण नाही. आई आजारी, जवळ छदामही नाही. नागपूर गाठायचे कसे, या विचाराने शबानाची घालमेल सुरू होती. मात्र, समाजात आजही माणुसकी आहे हे अधोरेखित करणारे प्रसंग शबानासोबत घडत होते. स्थानकावरील काही कर्मचार्‍यांनी वर्गणी जमा केली. दुपारी तिच्या भोजनाची सोय केली. मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला. दुपारी साडेचार वाजता तिला खासगी बसमधून नागपूरला पाठवण्यात आले.

आईच्या इलाजासाठी होते पैसे
शबाना सरदार खान ही मूळची नागपूरची. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ती बंगळुरूमध्ये एका कंपनीची सेल्स गर्ल म्हणून काम करते. आईची तब्येत ठीक नसल्याने ती रविवारी नागपूरला निघाली. कोईम्बतूर -कुर्ला या गाडीने पुण्यापर्यंत जाऊन तेथून बसने नागपूर गाठायचे असे तिने ठरवले होते. ती गाडीत बसली खरी पण नियतीच्या मनात मात्र वेगळेच होते. आईच्या आजारपणाच्या खर्चासाठी तिने सोबत 15 हजार रुपये घेतले होते. बॅगेत कंपनीच्या वस्तू तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती.