आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नजर चुकवून पिशवीतील दीड तोळ्याचे दागिने लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापुरात आज चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. पहिल्या घटनेत : कवितानगर पोलिस लाइनमध्ये राहणार्‍या दीपाली सचिन गलांडे यांच्या पिशवीतील दीड तोळयाचे मंगळसूत्र, सहाशे रुपये, पर्स असा ऐवज चोरीस गेला आहे. श्रीमती गलांडे रविवारी दुपारी चारच्या सुमाराला खरेदीसाठी मधला मारुती येथील बाजारात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची नजर चुकवून पिशवीत ठेवलेले दागिने, पैसे पळवून नेले. जोडभावी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. हवालदार मोटे तपास करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत मुरारजी पेठेतील यशनगरात राहणारे दत्तात्रय हळदे यांच्या घरात चोरी झाली आहे. रविवारी सकाळी ते परगावी गेले होते. सोमवारी सकाळी ते घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. अडीच तोळे सोन्याचे गंठण, एक तोळा लॉकेट, एक तोळे अंगठी (प्रत्येकी अर्धा तोळा), पाच ग्रॅम कर्णफुले, चांदीची भांडी असा ऐवज चोरीस गेला आहे. वॉल कम्पाउंडचा गेट आणि मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून कपाटातील दागिने चोरांनी पळवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार माने तपास करीत आहेत.

दूरचित्रवाणी संच पळवला
तिसर्‍या घटनेत विजापूर रोडवरील सुंदरमनगरमध्ये राहणार्‍या शैला महेश स्वामी यांच्या घरातील टीव्ही चोरीला गेला आहे. ही घटना रविवारी घडली. याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी प्रशांत विलास सावंत (वय 27, रा. सुंदरमनगर), आकाश अनिल दुधनकर (वय 19, रा. महालक्ष्मीनगर विजापूर रोड) या दोघांना संशयित म्हणून अटक केली आहे. दोघांनी मुख्य दरवाजा कडी कोयंडा उचकटून टीव्ही चोरला.