आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेविकेचे घर फोडले, चोऱ्यांत १४ तोळे लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मागीलआठ महिन्यांपासून शहरात चोरी झाली नाही असा एकही दिवस गेला नाही. गेल्या आठ दिवसांत तर चोरांनी धुडगूस सुरू केला आहे. दररोज किंवा एक दिवसाआड किमान चार-पाच चोऱ्या ठरलेल्याच अशी स्थिती आहे. बुधवारी काँग्रेसच्या नगरसेविका सारिका सतीश सुरवसे यांच्या घरात चोरी झाली. आठ तोळे दागिने, एलसीडी टीव्ही, पन्नास हजार रुपये असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. अन्य दोन ठिकाणीही घरफोडी झाली. सतीश सुरवसे यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे.
सोमवारी सुरवसे परिवार बंगळुरूला लक्ष्मीची मूर्ती आणण्यासाठी गेला होता. त्यांची दोन्ही मुले नातेवाइकांकडे होती. बुधवरी सकाळी त्यांचा मुलगा वेदांत कॉलेजला जाण्यापूर्वी घरी आला. मुख्य गेट उघडून आत गेल्यावर दाराचा कडीकोयंडा उचकटल्याचे दिसले. त्याने वडिलांना फोनवरून माहिती दिली. सुरवसे हे सोलापूरकडेच येत होते. पोलिसांना माहिती दिल्यानंतर श्वानपथक आले. कंपाउंडवरून चोरटे आत आले होते. हॉलचा दरवाजा उचकटून बेडरूमधील कपाट उचकटले काहीच हाती लागले नाही. दुसऱ्या बेडरूमच्या कपाटातील आठ तोळे दागिने ५२ हजार रुपये त्यांनी पळवले. नेकलेस, अंगठ्या, ब्रासलेट, मिनी मंगळसूत्र, गोफ रूद्राक्ष, चांदीचे पैंजण यांचा समावेश आहे. हॉलमधील २४ इंची एलसीसीडी टीव्ही नेला. श्वानपथकही कम्पाउंडवरूनच उडी मारून काही अंतरावर जाऊन थांबले.
दुसरीघटना : स्वागतनगरजवळील लतादेवीनगरात राहणारे समीर पठाण नागेंद्रनगर ब्लॉक नंबर ६९८ येथे राहणारे इलाही बाशा शेख यांचे घर फोडले. एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. बुधवारी पहाटे चारच्या सुमाराला ही घटना उघडकीस आली. पठाण यांच्या घरातून पाच तोळे सोने दागिने, चांदीचे पैंजण, बारा हजार रुपये नेलेत. त्यात सोन्याचे गंठण, मंगळसूत्र, बोरमाळ, रिंगा, अंगठ्या, ब्रासलेट, चांदीचे पैजण यांचा समावेश आहे. बंद घराचा कडीकोयंडा उचकटून चोरटे आत आले. शेजारी राहणारे शेख यांच्या घरातून सोळा तोळे वजनाचे चांदीचे पैंजण, सोन्याचे बदाम, पैसे असा ऐवज चोरीस गेला आहे.
तिसरीघटना : विजापूररस्त्यावरील सैनिकनगरातील संजय चव्हाण यांच्या घरात मंगळवारी दुपारी दोन ते तीन या वेळेत चोरी झाली. एक तोळा सोन्याचे गंठण, कानातील फुले, अंगठी, चांदीचे दागिने, लॅपटॉप, पाच हजार असा लाखाचा ऐवज चोरीस गेला.

क्राईम डीसीपी, एसीपी, पीआय म्हणतात...
वाढत्याचोऱ्या संदर्भात गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त नीलेश अष्टेकर यांना विचारले असता, "पेट्रोलिंग वाढवले आहे. कोम्बिंग ऑपरेशन घेणार आहोत असे म्हणाले.' सहायक आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर म्हणाल्या, "रात्रगस्त वाढवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. लवकरच चोरांना जेरबंद करू.' निरीक्षक संदीप गुरमे म्हणाले, "चोऱ्या वाढल्या आहेत. त्या रोखण्यासाठी नाकाबंदी, पेट्रोलिंगचा अवलंब करतो आहोत.'