आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आगामी निवडणूकीत महायुतीची सत्ता येणार, मी उपमुख्यमंत्री होईल'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मुंबईतल्या इंदू मिलच्या जागेवर 15 ऑगस्टपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम सुरू करा; अन्यथा रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करतील, असा इशारा पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी येथे दिला. येथील नॉर्थकोट मैदानावर झालेल्या संघर्ष मेळाव्यात त्यांनी ही भूमिका मांडली. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

आघाडीवर विश्वास नाही
डॉ. आंबेडकरांचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी इंदू मिलची जागा मिळवली. परंतु, सहा महिने झाले तरी प्रत्यक्ष कामास सुरवात नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आता विश्वास नाही. त्यांना आम्ही निवडून दिले आणि त्यांनी आम्हाला पाडले. पडायची आम्हाला सवयच आहे. परंतु, 2014 ची जोरदार तयारी सुरू केली. शिवसेना, भाजप, रिपाइंची महायुती मजबूत झाली. आगामी निवडणुकांमध्ये त्याला मोठे यश मिळेल. मी उपमुख्यमंत्री होईन, असा विश्वास श्री. आठवले यांनी व्यक्त केला.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पाणीटंचाईवर उपाय योजावेत, अवैध व्यवसाय बंद करावेत तरच हे सोलापूर सुंदर होईल, असे सांगून त्यांनी शहर आणि जिल्ह्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधले. सांगोल्यात टेंभू आणि म्हैसाळ योजना मार्गी लावाव्यात, कुडरुवाडीतील रेल्वे कार्यशाळेचे काम अधिक सुरळीत करण्याचे प्रयत्न करावेत, अशा सूचनाही आठवले यांनी मांडल्या. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजा सरवदे यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष सिद्धेश्वर पांडगळे यांनी स्वागत केले. या वेळी ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली.

धनगर समाजाला आमचा पाठिंबा
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची मागणी घेऊन धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यांना रिपाइंचा पाठिंबा असल्याचे श्री. आठवले यांनी जाहीर केले. नामांतर कसे घडवून आणायचे हे माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगले माहीत आहे, असेही ते म्हणाले.

मराठी, कन्नड आणि हिंदीतून झाले भाषण ..
शहर आणि जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी नॉर्थकोट मैदान भरले

सायंकाळी पाचचा मेळावा सातला सुरू; तब्बल 20 जणांचे मनोगत झाले

कर्नाटकातून आलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कन्नड, हिंदीतून भाषण केले

रायगडातून आलेल्या जगदीश गायकवाडांच्या अंगावर 5 किलो सोने होते

श्री. आठवले यांच्या पत्नी सौ. सीमा आणि मुलाचे मंचावर आगमन झाले

एक जूनला अनेक कार्यकर्त्यांचा वाढदिवस असल्याने सर्वांचा सत्कार झाला

आंबेडकरी जलसा गाणारे गायक संदीप शिंदे यांनी कार्यकर्त्यांना रिझवले

भारिप-बहुजन महासंघाच्या बहुतांश कार्यकर्त्यांचा आठवले गटात प्रवेश

दलित स्वयंसेवक संघाचे दिलीप देवकुळे हेही आठवले गटात सहभागी

संपूर्ण मैदानाला पोलिसांचा वेढा; दंगल नियंत्रण वाहन तैनात होते

दाढीला कोण लावेल हात?
यमक जुळवून भाषण करण्याची शैली श्री. आठवले यांनी या मेळाव्यात सोडली नाही. सुरवातीलाच त्यांची यमकांची कविता सुरू झाली. ते म्हणाले, ‘‘आता मजबूत करणार आहे जयभीमाच्या गाडीला, कुणात हिंमत आहे हात लावण्याची माझ्या दाढीला.’’ या त्यांच्या वाक्याने शिट्टय़ा वाजल्या.