आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपया घसरल्याने औषधी कंपन्या आल्या अडचणीत, पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या अभूतपूर्व घसरणीमुळे (68.80) सोलापुरातील औषधी घटक उत्पादक कंपन्यांना जोरदार आर्थिक फटका बसला आहे. किमान दहा वर्षे उद्योग मागे खेचल्याचे बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी म्हटले आहे. रुपयाची घसरण अशीच चालू राहिली तर हे उद्योग बंद पडण्याचा धोका असल्याची भीती त्यांनी वर्तवली.

चिंचोळी औद्योगिक वसाहतीत औषधी घटक उत्पादन करणार्‍या दहा कंपन्या आहेत. त्यांचा कच्चामाल प्रामुख्याने परदेशातून येतो. त्यावर प्रक्रिया करून तयार झालेली उत्पादने निर्यात केली जातात. रुपयाच्या घसरणीने आयात जादा आणि निर्यात कमी असलेल्या उत्पादनांचे दर एका रेषेत आले. त्यामुळे नफा बाजूलाच राहिला. स्थितीत सुधारणा न झाल्यास या कंपन्या तोट्यात जातील. परिणामी उत्पादन बंद करावे लागेल, असे वाम्सी लॅबचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप रेड्डी म्हणाले.

देशांतर्गत कच्चामाल घेऊन पक्कामाल निर्यात करणार्‍यांना मात्र रुपयाच्या घसरणीने सुखावले आहे. परंतु ही स्थिती कायमस्वरूपी राहणार नाही. दिवसागणिक त्यात बदल होत आहेत. त्यामुळे लाभाचे काही खरे नाही, अशी प्रतिक्रिया यंत्रमागांवरील उत्पादने निर्यात करणार्‍या मंडळींनी नोंदवली.

निर्यातीपेक्षा आयात जादा
औषधी घटक बनवण्यासाठी कच्च माल परदेशातून येतो. त्यासाठी डॉलरच्या तुलनेत पैसे मोजावे लागतात. माल निर्यात केल्यानंतर डॉलरच्या प्रमाणातच पैसे घेतो. ही प्रक्रिया आता एका समरेषेत आली आहे. त्यामुळे ना नफा-ना तोटा या तत्त्वावर उत्पादने करावी लागत आहेत. प्रताप रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक, वाम्सी लॅब

व्यापार्‍यांनाच जादा लाभ
थेट निर्यात करणारी मंडळी कमी आहेत. बहुतांश उत्पादक मुंबईतील व्यापार्‍यांच्या मध्यस्थीने निर्यात करतात. त्यामुळे रुपया घसरणीचा लाभ त्या व्यापार्‍यांनाच मिळतो. उत्पादक ज्या दराने करार करतो, त्याच दराचा धनी असतो. त्याला फार काही मिळणार नाही. राजेश गोसकी, निर्यातदार

नियंत्रणच राहिले नाही
रुपयाच्या किंचित घसरणीला पूर्वी किमान सहा महिने लागायचे. त्यामुळे त्याचा फार काही परिणाम जाणवत नव्हता; परंतु आता तशी स्थिती नाही. आज काय दर आहे आणि उद्या काय राहील, काहीच सांगता येत नाही. स्थिती अशीच राहिली तर उत्पादनच बंद करावे लागेल. डी. राम रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक बालाजी अमाइन्स

अस्थैर्यामुळे लाभ नाही
डॉलर वधारला तर निर्यातदारांना फायदा होतो; परंतु स्थिती स्थिर राहिली तरच. स्थिती अस्थैर्याची आहे. आधुनिक यंत्रमाग आयात केल्यास कैक पटीने पैसे मोजावे लागतील. त्यामुळे नव्याने गुंतवणूक होणार नाही. निर्यातदारांनाही लाभाचे सांगता येणार नाही. सत्यराम म्याकल, अध्यक्ष, टीडीएफ

थेट परिणाम सर्वसामान्यांवर
घसरणीचा आलेख अजून खाली जाईल, असे वाटत नाही. मात्र घसरणीचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होईल. डिझेल, पेट्रोलचे दर वाढतील. त्यामुळे साहजिकच महागाई वाढेल. उद्योग-धंद्यांचा विचार केल्यास आधी सौदे केलेल्या निर्यातदारांना फायदाच आहे. आयात करणारे मात्र अडचणीत येतील. ऋषिकेश शहा, अध्यक्ष, सीए असोसिएशन