सोलापूर. मुस्लिम समाजाच्या उन्नतीकरिता सादर करण्यात आलेल्या सच्चर समितीच्या अहवालाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करत आहोत. येत्या काळात या अहवालाची शंभर टक्के अंमलबजावणी करू, अशी हमी अल्पसंख्यक विकास विभाग मंत्री आरिफ नसिम खान यांनी दिली. एका कार्यक्रमानिमित्त सोलापुरात आलेल्या खान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
आझाद महामंडळाचे भागभांडवल वाढवू
मौलाना आझाद अल्पसंख्यक विकास महामंडळाचे भागभांडवल वाढवून देऊ. 2009 मध्ये फक्त 80 कोटी भागभांडवल होते, आता 500 कोटींपर्यंत गेले आहे. वसुली झाली नाही म्हणून चार वर्षांत कर्ज प्रकरण रखडले. मात्र, शैक्षणिक कर्जाचे एकही प्रकरण रखडण्यात आले नाही.
अल्पसंख्यक आयोगास दिवाणी अधिकार
अल्पसंख्यक समाजावर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी अल्पसंख्यक आयोग नेमण्यात आला. तसेच या आयोगास दिवाणी अधिकार देण्यात आले आहेत. दंगली झाल्या आहेत तेथे नेमलेल्या चौकशी समितीने मंत्रिमडळाकडे अहवाल सादर करावेत. त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
वक्फ बोर्डाची एक लाख हेक्टर जागा
वक्फ बोर्डाची महाराष्ट्रात एक लाख हेक्टर जागा असून, 60 टक्के जागांवर दुसर्यांचा कब्जा आहे. त्या जागा ताब्यात घेण्यासाठी संबंधितांवर कारवाई केली जात आहे. कारवाई करून आतापर्यंत 500 एकर जागा ताब्यात घेण्यात आली आहे. सर्वाधिक जागा सोलापुरात असून कब्जा केलेल्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
मदरशांचे आधुनिकीकरण योजनेअंतर्गत अनुदान
मदरशांच्या आधुनिकीरण योजनेंतर्गत पायाभूत सुविधा व धार्मिकतेबरोबर इतर शिक्षणासाठी अनुदान देण्यात येणार आहे. येत्या 2015 पर्यंत 500 मदरशांना मदत दिली जाणार आहे. शिक्षण संस्थेमध्ये पायाभूत सुविधांसाठी दोन लाख रुपये देण्यात येत आहेत. महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती हद्दीतील वस्त्यांमध्येही सुविधांसाठी अनुदान दिले जात आहे.
अल्पसंख्यकांकरता जुलैपासून आयटीआय
अल्पसंख्यक समाजाकरता 44 आयटीआय सुरू करण्यात आले असून, यामध्ये 4500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 12 पॉलिटेक्निक उभारले असून, 1860 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सोलापुरात जे शासकीय आयटीआय आहे. त्यामध्ये जुलैपासून दुसर्या पाळीमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुरू होईल. नागपूर व औरंगाबाद येथे हजहाऊस बांधले आहे.
साडेआठ लाख विद्यार्थी घेताहेत शिष्यवृत्ती
राज्यात अल्पसंख्यक समाजातील साडेआठ लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ होत आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. प्रोफेशनल कोर्सेससाठी पूर्वी 25 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती. आता 50 हजार रुपये देण्याचा प्रयत्न आहे. बॅँकिंग, एमपीएससी आदी अनेक कोर्सेसकरता फ्री कोचिंग योजना सुरू करण्यात येणार आहे.
रक्ताची होळी खेळणारा पंतप्रधान होऊ शकत नाही
भारत धर्मनिरपेक्ष देश असून, यामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. गुजरातमध्ये रक्ताची होळी खेळणारा कधीच देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही, असा शाब्दिक हल्ला अल्पसंख्याक विभाग मंत्री आरिफ नसिम खान यांनी नरेंद्र मोदींवर केला. राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे सोलापुरात उर्दू घर व विद्यार्थिनींकरता वसतिगृह उभारण्यात येणार आहे. त्याच्या कोनशिला समारंभात अध्यक्षस्थानावरून खान बोलत होते. मंत्री खान म्हणाले, ‘धर्माच्या नावावर मते मागून वाद निर्माण करून कोणी सत्तेवर येऊ शकत नाही. सभेमध्ये मुस्लिम बांधवांनी सत्कारप्रसंगी मोदी यांना दिलेल्या टोपीचा स्वीकार केला नाही. असा पक्षपातीपणा काँग्रेसच्या कुठल्याच नेत्यामध्ये नाही. आरएसएस या जातीयवादी संघटनेचा अजेंडा नरेंद्र मोदी लागू करणार आहेत. भाजप त्याचा एक भाग आहे. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन अशा जातीयवादी पक्षाचा नायनाट करावा.’