आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadabhau Khot News In Marathi, Sharad Pawar, Swabhimani Shetkari Sanghatna

कारखानदारी बंद पाडण्यासाठी नव्हे, सहकारचे धोरण बदलण्यासाठी लढू - सदाभाऊ खोत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - सदाभाऊ खासदार झाले तर पुन्हा आंदोलने होतील, कारखानदारी बंद पडेल, अशी भीती शरद पवारांसह अनेक कारखानदारांकडून शेतकर्‍यांना दाखवली जात आहे. प्रत्यक्षात तसे होणार नाही. आताची सहकार चळवळ, साखर कारखानदारी मूठभर लोकांसाठी काम करीत आहे. हे धोरण बदलण्यासाठी मी रस्त्यावर उतरण्याऐवजी संसदेत जाऊन लढेन, असे प्रत्युत्तर माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिले. खोत हे मंगळवारी पंढरपूर तालुक्याच्या दौर्‍यावर होते. धावत्या दौर्‍यात त्यांच्या गाडीमध्ये त्यांच्याशी संवाद साधला.


माढय़ातील महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांचे कृषिमंत्री शरद पवार यांना प्रत्युत्तर
प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यात ‘स्वाभिमानीच्या शिट्टीचा आवाज’ कमी झाल्याची चर्चा आहे. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? सदाभाऊ : माळशिरस तालुक्यातील आमचे लोक हे मोहिते-पाटलांचे पारंपरिक विरोधक आहेत. त्यामुळे ते ताकदीने काम करतील, असा आम्हाला विश्वास आहे. या भागात लवकरच दौरे होणार आहेत. तिथे काहीही अडचण येणार नाही.
प्रतिनिधी : माण, फलटणमध्ये स्वाभिमानीचे संघटन नाही, असे म्हटले जाते. तुम्ही नेमके काय करणार? सदाभाऊ : राष्ट्रवादीचे नेते नेहमी असेच हवेत बोलतात. परवा दहिवडी येथे गोपीनाथ मुंडे यांची सभा झाली. या ठिकाणी पवारांचीही सभा झाली. पवारांच्या तुलनेत मुंडे यांच्या सभेला तिप्पट गर्दी होती. आता संघटन नसताना एवढी गर्दी होते, असे म्हणता येईल का? मुळात राष्ट्रवादीकडे नेत्यांची गर्दी झाली आहे. माझ्याकडे सामान्यांची गर्दी आहे.
प्रतिनिधी : केवळ ऊस, साखर कारखाने यावर प्रचार सुरू आहे. विकासाच्या इतर मुद्दय़ांचे काय? सदाभाऊ : मी विकासाच्या मुद्दय़ावरच निवडणूक लढवत आहे. मतदारसंघातील 60 टक्के भाग दुष्काळी आहे. रोजगार, विजेचा प्रश्न आहे. विरोधक खोत या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करीत आहेत. त्यामुळे तेच ते प्रश्न उपस्थित करून ते लोकांची दिशाभूल करीत आहेत. माढा मतदारसंघ हा ‘विकासाचे मॉडेल’ करण्याचा माझा प्रयत्न असेल.
प्रतिनिधी : शरद पवारांनी ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनामुळे कारखानदारी बंद पडेल, असा आरोप केलाय? सदाभाऊ: आजपर्यंतच्या आयुष्यात मी शरद पवार यांच्यासारखा ढोंगी माणूस पाहिलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी येथील सहकार चळवळ मोडीत काढली. राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून अडचणीत आलेले कारखाने अल्प किमतीला विकण्यात आले. कारखाने विक्रीची सीबीआय चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर येईल.