आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadabhau Khot News In Marathi, Swabhimani Shetkari Sanghatna, NCP

‘खरी लढत प्रतापसिंह मोहितेंशीच’,सदाभाऊ खोतांकडून प्रतिस्पर्ध्याचे कौतुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - ‘राष्ट्रवादी काँग्रेसवर जनता अत्यंत नाराज आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातून आपले खरे प्रतिस्पर्धी विजयसिंह नसून अपक्ष उमेदवार प्रतापसिंह मोहितेच असतील. प्रतापसिंहांनी दुष्काळाच्या वेळी निदान आंदोलने करून जनतेला दिलासा देण्याचा तरी प्रयत्न केला आहे’, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांनी प्रतिस्पर्ध्याचे कौतुक केले.


पंढरीत कुटुंबीयांसह श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन खोत यांनी मंगळवारी प्रचाराचा शुभारंभ केला. या वेळी ते म्हणाले, ‘दुष्काळात अजित पवारांचे उजनी धरणाच्या पाण्याबाबतचे वक्तव्य आजदेखील जनतेच्या लक्षात आहे.’


या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तम जानकर, दीपक भोसले, संजय पाटील घाटणेकर तसेच शिवसेनेचे साईनाथ अभंगराव, संभाजी शिंदे, संदीप केंदळे, भारतीय जनता पक्षाचे बादलसिंह ठाकुर, दत्तासिंह परदेशी, शंकुतला नडगिरे, रिपब्लिकन पक्षाचे कीर्तिपाल सर्वगोड आदी उपस्थित होते.

अलिबाबांची गुहा उघडणार
माढा लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत विरोधकांकडून 200 ते 300 कोटींचा चुराडा होणार आहे. आपल्या उमेदवारीमुळे विरोधक आलिबाबांची गुहा उघडणार आहे. त्यामुळे श्री.खोत यांनी मतदारांना ज्याला जेवढे मिळवायाचे तेवढे मिळवून घ्यावे असेही अवाहन केले आहे. आपल्याकडे मतदारराजाला देण्यासारखे काही नाही. जर त्यांनी मागितले तर आयुष्य त्यांच्यासाठी खर्च करू, असेही श्री.खोत यांनी सांगितले.

सदाभाऊ खोत म्हणतात,
धनशक्तीबरोबरच जनशक्तीची ही निवडणूक आहे. जनतेच्या घामाच्या पैशातूनच निवडणूक लढविणार आहे. त्यामुळेच व्होट बरोबरच नोट देखील मतदार आपणाला देत आहेत. जिल्ह्यातील नेते आजपर्यंत दुष्काळ पुरवून खात होते. येथील नेत्यांमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी जिल्हा सोडून निवडणूक लढवून दाखवावी. आपण खरोखरच काम केले आहे म्हणून माढ्यातून रिंगणात उतरलो आहे. काँग्रेस,राष्ट्रवादीच्या काळात बोटावरील शाईपुरतीच लोकशाही आहे, बाकी सगळीकडे ठोकशाहीच आहे.


सदाभाऊंच्या घोषणा
राज्यात महायुती सत्तेवर आल्यानंतर सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे तसेच पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचे नाव देण्यात येणार. मराठा आरक्षणाचा अहवाल केंद्र व राज्याकडे पाठवून त्वरित अंमलबजावणी करण्यात येणार. शेतक-यांचे ऊस, दुधासारखे प्रश्न दिल्लीपर्यंत पोहचविणार. होलार, महादेव कोळी आदी समाजांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करणार.


...तर मोहितेंचे अभिनंदनच !
प्रतापसिंह मोहिते यांनी निवडणुकीतून माघार घेतली तर, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता खोत म्हणाले, ‘तर मग आपला विजय निश्चितच आहे. त्यांनी माघार घेतली तर आपण त्यांचे अभिनंदन करू. जनतेला बरोबर घेऊन आम्हाला जिल्ह्यातील राजकारण्यांच्या वतनदा-या संपवायच्या आहेत. घराणेशाहीच्या परंपरेचा बीमोड करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे’.

आपल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारी अडचणीत येईल, असाही विरोधक प्रचार करीत आहेत. आझाद मैदानावर अण्णा हजारे, मेधा पाटकर आणि राजू शेट्टींसह आपण देखील राज्यातील सहकारी साखर कारखाने मोडीत काढता येणार नाहीत तसेच विकता येणार नाहीत या मागणीसाठी आंदोलन केल्याचीही विरोधकांना आठवण करून देत असल्याचेही खोत म्हणाले.