आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadhabhaou Khot Comment On Raju Shetty Statement

संघटनेच्या निर्णयास विरोध करणाऱ्यांना डच्चू - सदाभाऊ खोत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - खासदार राजू शेट्टी यांनी परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घेतले आहेत. त्यामुळे संघटनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी या निर्णयांना जाणीवपूर्वक विरोध केल्यास संघटनेत स्वच्छता मोहीम राबवावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारकांच्या संघटनेतील प्रवेशाबाबत संघटनेतील काही स्थानिक कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे.

भारतीय जनता पक्षाच्याआमदार पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेचे स्वागत करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खोत हे सोमवारी येथे आले होते. त्या वेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष दीपक भोसले, माऊली हळणवर, अण्णा गायकवाड, सचिन पाटील आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी परिचारक यांना संघटनेचे सदस्यत्व देण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये परिचारकांचा संघटनेत जाहीर प्रवेश होणार आहे. सत्तेवर आल्यानंतर ऊस आंदोलकांवरील खटल्यांचा पूर्णपणे निपटारा केला जाणार आहे.

कारखान्यांमधील अंतर अट रद्द करणार
दोन साखर कारखान्यांमध्ये १५ किलोमीटर हवाई अंतराची केंद्र शासनाची अट आहे. राज्य सरकारने २५ किमी केले आहे. ते रद्द करण्यात येईल.

सहकार वाढीस प्रयत्न
लहान-लहान शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन साखर कारखाना उभारणीचा प्रस्ताव दिला तर त्यास ताबडतोब मंजुरी देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न राहणार. कारखाना उभारणीसाठी विशिष्ट कंपनीकडूनच यंत्रसामग्री खरेदी करण्याच्या सध्याच्या अटी आहेत. त्या रद्द करणार असल्याची ग्वाही खोत यांनी दिली.