आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sahara City Homes News In Marathi, Investment, Solapur, Divya Marathi

सोलापूरची ‘सहारा सिटी होम्स’ उजाडच; गुंतवणूक बे‘सहारा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सहारा इंडिया समूहाने सोलापुरात 2003 मध्ये ‘सहारा सिटी होम्स’ची घोषणा केली होती. पुणे रस्त्यावरील हॉटेल जंगलीसमोर 125 एकर जमीन घेऊन घरांसाठी बुकिंग करून घेतले. परंतु मूळ प्रकल्प काही साकारला नाही. 2012 मध्ये प्रकल्पाची फेररचना केली. गुंतवणूकदारांकडून 5 टक्के रक्कम घेतली. 36 महिन्यांत घरांचा ताबा देण्याचा करार केला; अद्याप जागेवर बांधकाम नाही.

नुसतेच उजाड माळरान. गुंतवणूकदारांची मुदत पुढील वर्षी संपणार आहे. पण व्यवस्थापनाकडे उत्तर नाही. त्यामुळे सोलापूरकरांची पावणेदोन कोटी रुपयांची गुंतवणूक बे‘सहारा’ होण्याची चिन्हे आहेत.24 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी सहाराप्रमुख सुब्रतो रॉय तिहार तुरुंगात आहेत. त्यामुळे देशभरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली. सोलापूरच्या ‘सहारा सिटी होम्स’ची काय स्थिती असावी, हे जाणून घेण्यासाठी मंगळवारी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने प्रकल्पस्थळी भेट दिली. 125 एकराला कुंपण, नमुन्यादाखल दोन स्वतंत्र बंगले, उर्वरित माळरान असे एकूण चित्र. आकर्षक प्रवेशद्वार, तिथे दोन सुरक्षारक्षक. तिथून प्रवेश केल्यानंतर एक छोटेसे कार्यालय. तिथे कंपनीचे अधिकारी होते. पण प्रकल्पाच्या भवितव्याविषयी बोलण्यास त्यांनी नकार दिला. पुण्यातील वरिष्ठ कार्यालयातूनच माहिती घ्या, हे त्यांचे उत्तर आहे.


समूहाने दाखवली भव्य-दिव्यतेची स्वप्ने
‘सहारा सिटी, जहाँ बसे भारत’ हे घोषवाक्य घेऊन सहारा इंडिया समूहाने सोलापुरात गृहप्रकल्प सुरू केले. त्यासाठी देशभरात 40 हजार एकर जमीन घेतली. सोलापूर-पुणे रस्त्यावर 125 एकर जमीन आहे. त्यावर 108 कोटी रुपये खर्च करून ‘लॅव्हीश टाऊनशीप’ विकसित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ज्यात वन बीएचकेपासून स्वतंत्र बंगलोज, सुरक्षित प्रवेशद्वार, शॉपिंग मॉल, सिनेमा थिएटर, रुग्णालय, शाळा, बँक, जिम, खेळासाठी मैदान अशा अनेक सुविधा देणार असल्याचे सांगण्यात आले. या भव्य-दिव्य स्वप्नांसाठी सोलापुरातील मध्यमवर्गीय या प्रकल्पात सहभागी झाला.


मी पैसे परत घेतले
सहारा इंडिया समूहाचा गृहप्रकल्प होण्याची कुठलीच चिन्हे दिसत नाहीत म्हणून मी पैसे परत घेतले. कंपनीची सध्याची स्थिती पाहून तर मी वाचलोच असे वाटते.’’ बाबूराव घुगे, गुंतवणूकदार


सहा एकर जागा दिली
जमिनीचा शोध घेताना पुणे रस्त्यावरील माझ्या मालकीची जमीन दिली. भावाच्या नावाने घरही बुकिंग केले. आता घर मिळण्याची चिन्हे नाहीत.’’ बाबूभाई मेहता, गुंतवणूकदार


एक पैसाही बुडवणार नाही
परिवारचे प्रमुखच तुरुंगात असल्याने आम्ही संकटात आहोत. कुठल्याही गुंतवणूकदाराचा एक नया पैसा बुडवणार नाही, याची हमी दिलीच आहे. गुंतवणूकदारांनी कुठलीही भीती बाळगू नये.’’ सिद्धार्थ सिंग, ग्राहक संवाद अधिकारी, पुणे