आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणारच - मराठे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘मी ए ग्रेडचा उमेदवार आहे, असा माझा दावा नाही; पण मी नक्कीच बी प्लस’ लेखक आहे. माझी जवळपास 50 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यापूर्वी शंकर सारडा यांच्यावरील मित्रप्रेमाखातर एकदा माघार घेतली होती, परंतु आता माघार घेणार नाही. निवडणूक लढवण्याचा अनुभव एकदा आयुष्यात घ्यायचा होता, ती संधी आता आली आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उभे असलेले उमेदवार ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांनी व्यक्त केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमावेळी ते बोलत होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक म्हणजे आजपर्यंतची साहित्यिक कारकीर्द मोजण्याची फुटपट्टी नाही किंवा पराभूत झाले म्हणजे साहित्यसेवेला विराम मिळेल असेही नाही. त्याने साहित्यिक म्हणून कोणीही लहान-मोठा ठरत नाही. ती केवळ एक प्रक्रिया आहे. ते म्हणाले, निवडणुकीत एकदा तरी आपटी खाल्लय़ाखेरीज निवडूनही येत नाही. परंतु ही माझी पहिली आणि शेवटची निवडणूक आहे.
महाराष्ट्र व बाहेरील संघ तसेच परिषदेचे एकूण 1068 मतदार आहेत. त्यात सोलापूरच्या 13 जणांचा समावेश आहे. उद्या 9 जुलैला ते नामनिर्देशन अर्ज भरणार आहेत. 26 जुलैपर्यंत अर्ज माघारी घ्यायची मुदत असून, 27 जुलैला एकूण चित्र स्पष्ट होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपण पुढाकार घेणार नाही, ज्यांना घ्यायचा आहे, त्यांनी घ्यावा मी मात्र अध्यक्षपद मिळवण्यासाठीच निवडणुकीत उतरलो आहे. निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी, काळेशार पाणी, न्यूज स्टोरी, ज्वालामुखी, टार्गेट, मार्केट, बालकांड, ललित. पोहरा आदी कथाकादंबर्‍या प्रकाशित झाल्या आहेत. पक्षिणी कथासंग्रहासाठी राज्य पुरस्कार, मसापचा ह. ना. आपटे पुरस्कार, कोकण साहित्यभूषण पुरस्कार मिळालेले आहेत. प्रारंभी संघाचे अध्यक्ष मनोज व्हटकर यांनी स्वागत केले.
साहित्यातील योगदान - 1956 सालापासून आजपर्यंत लघु कादंबर्‍या, कथा, संपादकीय, लेखमाला, दिवाळी अंकात लिखाण करतो आहे. ‘एक माणूस एक दिवस’ या उपक्रमाद्वारे नामवंतांसोबत एक दिवस व्यतित करून त्यांच्यावरती लिहिण्याचा हा प्रकारही मीच सुरू केला.
तिघांचीही नावे नाहीत यादीत - या निवडणुकीचे वैशिष्ट्य असे की, अध्यक्षपदासाठी उभे असलेल्या अशोक बागवे, ह.मो.मराठे व नागनाथ कोत्तापल्ले या तिघांचीही मतदार यादीत नावे नाहीत. परंतु प्रत्येकजण निवडणूक प्रचार व गाठीभेटीत व्यस्त आहे. ही माहिती स्वत: मराठे यांनीच दिली.