आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sambhaji Maharaj Kolhapur Speech In Solapur On Shiv Jayanti

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकर्‍यांना न्याय देणारा, महिलांचा आदर करणारा होता ‘शिवकाळ’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवंशात माझा जन्म झाला, याचा मला सार्थ अभिमान आहे. छत्रपतींनी सर्वच प्रजाजनाला सारखे मानले होते. स्वराज्यात सर्वच जाती-धर्माच्या लोकांना, स्त्री-पुरुषांना समानतेची वागणूक मिळत होती. स्वराज्य निर्मिती करताना शिवराय कोणत्या विशिष्ठ धर्मविरोधी लढले नाहीत. ते रयतेच्या सुखासाठी ‘स्वराज्य’ निर्मितीसाठी ‘स्वराज्याचा शत्रू तो सार्‍यांचा शत्रू’ या न्यायाने लढलेले आहेत. यात आपला परका असा भेद त्यांनी केलेला नाही.

स्वराज्य कार्य साधताना महाराजांच्या जीवनात असंख्य घटना घडलेल्या आहेत. तरीदेखील अनेकवेळा अफजलखानला ठार मारणे, शाहिस्तेखानाची बोटे छाटणे, अशा घटना म्हणजे महाराजांच्या समग्र चरित्राचे सार होय, अशारीतीने त्यांच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला जातो. या घटना महत्त्वाच्या आहेत. परंतु महाराजांचे युद्धकौशल्य, रणनीती, मुत्सद्दीपणा, प्रजाहितदक्ष राज्य कारभाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

शिवशाहीतील सूशासन-शिवरायांनी स्वराज्य निर्मितीकरिता प्रथम प्रजेच्या दु:खाचे निदान केले व त्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यांनी सर्वप्रथम जमिनीची मोजणी केली. त्यामुळे सारा वसुलीत सुसूत्रता आली. रयतेस बी-बियाणे व गुरे-ढोरे देण्याची व्यवस्था केली. त्यांना खाण्यासाठी धान्य देण्याचीही व्यवस्था केली. वतनदारांनी रयतेला त्नास देऊ नये म्हणून वतनदारांचा योग्य बंदोबस्त केला. शिवरायांचे हेर खाते अत्यंत सक्षम व संवेदनशील असे होते. यात विविध जाती-जमातीतील लोक स्वराज्यासाठी जीवावर उदार होऊन कार्य करीत होते. या हेरखात्याच्या योगदानावरच शिवरायांनी अनेक युद्धमोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या. सूरतेची लूट, अफजलखानावरील विजय व आग्य््रातून सुटका ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. यामुळे जगभर शिवरायांच्या ह्यगनिमी कावा या युद्धतंत्नाचा, त्यांच्या पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटकेचा व आग्र्याच्या कैदेतून यशस्वी सुटकेचा अभ्यास केला जात आहे. अमेरिकेने नुकतीच पाकिस्तानमध्ये जाऊन अतिरेकी ह्यओसामा बीन लादेन याचा केलेला खात्मा शिवरायांच्या शाहिस्तेखानावरील कारवाईची आठवण करून दिल्याशिवाय राहात नाही.

शिवशाहीमध्ये रयतेला काडीचाही त्नास नव्हता. सैनिकांचा रयतेला त्नास होऊ नये, त्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, आरमारासाठी लागणारे लाकूड शेतकर्‍यांकडून योग्य मोबदला देऊनच खरेदी करावे, अशी सक्त ताकीद सैनिकांना होती. शाहिस्तेखानाची स्वारी आल्यानंतर प्रजेची काळजी घेताना शिवराय आपल्या सेनाधिकार्‍यांना लिहितात, ह्यतमाम रयतेला घाटाखाली सुरक्षित ठिकाणी पाठवावे, खानाकडून रयतेस तोशिस पडू देऊ नये, अन्यथा सुलतानशाही आणि स्वराज्यात फराक तो काय?

शिवशाहीतील कल्याणकारी राज्य पाहिल्यावर स्वातंत्र्याच्या 65 वर्षांनंतरही आजची प्रजा खर्‍या अर्थाने सुखी झाली आहे का? हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. धरणांच्या बांधणीमुळे धरणग्रस्त झालेली मुलनिवासी जनता, दुष्काळामुळे पाण्यासाठी टाहो फोडणारी विदर्भातील जनता आणि महागाईच्या आगडोंबात होरपळणारी आजची जनता पाहिली की, अंतर्मनाला कुठेतरी टोचणी लागते. शिवशाहीचे राज्य पुन्हा अवतरण्याची इच्छा म्हणूनच व्यक्त केली जाते.

स्त्रियांचे संरक्षण हेच शिवशाहीचे धोरण
शिवशाहीत स्त्रियांना सन्मानाची व न्यायाची वागणूक मिळत होती. स्त्रियांवरील अत्याचाराबद्दल कठोर शिक्षा देण्यात येत असे. रांज्याच्या पाटलाने एका गरीब स्त्रीसोबत ’बदअमल’ केला. केवळ 16 वर्षांच्या शिवबाने या पाटलाचे हात-पाय तोडण्याचे आदेश दिले आणि अमलातही आणले. दुसरे उदाहरण कल्याणच्या स्वारीतील आहे. कल्याण लुटीच्या वेळी कल्याणच्या मुसलमान सुभेदाराची सून पळवून आणणार्‍या सैनिकास शिवरायांनी शिक्षा दिलीच; पण हात-पाय छाटून राज्याबाहेर काढून दिले. त्या स्त्रीला सन्मानपूर्वक तिच्या सासरी पाठवले. यातून शिवरायांचे महिलांविषयीचे धोरण स्पष्ट होते.

महिलांकडेही जबाबदारी
शिवरायांनी महिलांना आदराची वागणूक दिलीच, शिवाय काही महिलांना गावचे रक्षण करण्याची जबाबदारी दिली. शिवाय ढाली-तलवारी, भाले तयार करणे त्यांना धार लावणे अशी रोजगाराभिमुख कामे दिली. त्याचा रोख पगार स्त्रियांना शिवकाळात मिळत होता. स्त्रियांविषयीच्या समतावादी दृष्टिकोनामुळेच पुढे येसूबाई, ताराराणी, उमाबाई दाभाडे, अहिल्याबाई होळकर या कर्तृत्ववान स्त्रिया मराठेशाहीमध्ये ठसा उमटवू शकल्या.