आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sambhajiraje Speaking On Maratha Reservation At Solapur

लोकसभेपूर्वीच आरक्षण द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा छत्रपती संभाजीराजे यांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आता पुरे झाले, येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला.

मराठा समाजाच्या अनेक मागण्यांकरिता छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्‍ट्रभर शिव- शाहू यात्रा काढली होती. या यात्रेचे सोलापुरात आगमन झाल्यानंतर चार हुतात्मा चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर प्रशांत गायकवाड, श्रीमंत कोकाटे, शिवसेनेचे लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, भाजपचे शहाजी पवार, राष्‍ट्रवादीचे पद्माकर काळे, अस्मिता गायकवाड, प्रताप चव्हाण, जन्मेजय भोसले, अमोल शिंदे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाडगे, महेश सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणास धक्का लागता कामा नये. इतर राज्यांत समांतर आरक्षण दिले जाते, मग महाराष्‍ट्रात का दिले जात नाही. पक्षांतर्गत असलेल्या हुकूमशाहीमुळे मराठा समाजास आरक्षण दिले जात नाही. ही हुकूमशाही मोडून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.’ कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहीर राजेंद्र कांबळे यांनी महात्मा फुले, अमर शेख यांचे पोवाडे सादर केले. श्रीकांत घाडगे यांनी प्रास्ताविक केले. महेश सावंत यांनी आभार मानले.

या आहेत मागण्या
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम त्वरित सुरू करावे, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षण द्यावे, ऐतिहासिक गडकिल्ल्यांची पुनर्बांधणी करावी, 6 जून शिवराज्याभिषेक दिन राष्‍ट्रीय सण म्हणून लोकोत्सव व्हावा व त्यादिवशी शासकीय सुटी जाहीर करावी, शेतकºयांना मोफत वीज देण्यात यावी, स्त्रियांना संरक्षण व समान अधिकार द्यावेत, तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावेत.