आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समीक्षा’चे समीक्षण: शून्य कचरा नियोजनऐवजी पालिकेत राजकरण तापले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील कचर्‍या निर्मूलनावरून महापालिकेत चांगलेच राजकारण तापले आहे. या प्रकरणात नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पुढाकार घेत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत महापौर, समीक्षा कन्स्ट्रक्शन आणि आयुक्तांसह काही अधिकार्‍यांना टार्गेट केले आहे. नागरिकांना कचर्‍यापासून मुक्ती मिळावी आणि शहरातील कचर्‍याचे नियोजन शून्यावर आणण्याऐवजी ‘समीक्षा’चा मक्ता रद्द करा, अशी मागणी होत आहे. या सर्व प्रकारात राजकारण असण्याची शक्यता व्यक्त होत असून, यामध्ये सत्ताधारी पक्षातील नगरसेवक याचे सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे.

शहरातील कचरा उचलण्यासाठी समीक्षा कंपनीला दहा वर्षांसाठी मक्ता देण्यात आला आहे. यापोटी कंपनीला 114 कोटी रुपये देण्यात येणार आहे. हा आकडा पाहता सर्वांचे डोळे वटारले आहेत. त्यामुळे ‘समीक्षा’चे समीक्षण करण्याची तयारी सुरू आहे. नगरसेवक चंदनशिवे हे गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत ‘समीक्षा’चा मक्ता रद्द करा, अशी आग्रही मागणी करत आहेत. शहरातील दररोज पडणारा कचरा आणि तो उचलण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात त्यावर बोलण्यास ते तयार नाहीत. मक्ता रद्द करा हा एकच अजेंडा चंदनशिवे यांचा आहे. या सर्व प्रकारामुळे शहरातील शून्य कचरा नियोजनाचा बोर्‍या वाजला आहे. कचरा मक्त्यात गैरव्यवहार झाले असेल तर आयुक्त आणि तसेच अधिकार्‍यांवर तक्रार करून त्यातील सत्य बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण सध्या जे आरोप-प्रत्यारोप होत आहेत त्यामागे राजकारण असल्याची चर्चा आहे.

नगरसेवक चंदनशिवे यांना कागदपत्र देणारा ‘अण्णा’ कोण? चंदनशिवे यांच्या माध्यमातून महापालिकेतील अंतर्गत राजकारणाची चर्चा सुरू झाली. कचर्‍यावर विरोधीपक्ष बोलत नाही. विरोधीपक्षनेत्या रोहिणी तडवळकर महापौरांची बाजू घेत चंदनशिवे यांच्यावर आरोप करीत आहेत. चंदनशिवे यांनी स्वत: हे प्रकरण हाती घेतले असेल तर ते तडीस नेण्यासाठी शहरातील नागरिक त्यांच्यासोबत असतील हे मात्र नक्की.

समोर बसून चर्चा करा
नगरसेवक चंदनशिवे हे वृत्तपत्राच्या माध्यमातून आरोप करून सवंग प्रसिद्धी मिळवत आहेत. त्यांनी याप्रकरणी थेट आयुक्ताकडे तक्रार करावी, तेथे समाधान झाले नाहीतर नगरविकास खात्याकडे तक्रार करावी, सभागृहात विषय आणून चर्चा करावी, तेथे समाधान झाले नाहीतर कागदपत्रांसह न्यायालयात दाद मागावी. यावरही त्यांचे समाधान होत नसल्यास माझ्यासमोर बसून चर्चा करावी, असे आवाहन महापौर अलका राठोड यांनी पुन्हा केले आहे.