आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन आणि सोलापूर; ऋणानुबंधाची घट्ट वीण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विक्रमादित्य सचिन तेंडुलकर एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमासाठी व लग्नसमारंभासाठी सोलापुरात आला होता. शनिवारी लिटल मास्टरच्या निवृत्तीचा शेवटचा सामना भारताने जिंकला. निवृत्ती आणि सचिनच्या देदीप्यमान योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने भारतरत्न किताब जाहीर केला आहे. संपूर्ण भारत सचिनमय झालेले असताना सचिनच्या सोलापूरच्या त्या भेटीच्या आठवणींना उजाळा मिळाला .
पुष्प अकादमीचे रवींद्र गायकवाड हे लिटल फ्लॉवर शाळेचे माजी विद्यार्थी. त्यांच्या प्रयत्नामुळेच सचिनने शाळेला भेटी दिली. तेंडुलकर सोलापुरात येणार ही बातमी गुप्त ठेवण्यात आली होती. प्रसारमाध्यमांपासूनही ती लपवण्यात आली. तो दिवस होता रविवार, 28 ऑगस्ट 2005. सचिन आल्याची बातमी थोडक्या प्रेक्षकांनाच समजली. होटगी रस्त्यावरील सोलापूर विमानतळावर मास्टर ब्लास्टरचे आगमन झाले, तेव्हा सकाळचे 11 वाजले होते. होंडा सिटी या ब्राऊन कारमधून तो उतरला. पिवळा टी शर्ट, निळी जिन पँट, डोळ्यावर गॉगल असा पेहराव त्याने केला होता. गायकवाड यांच्या अंत्रोळीकर निवासस्थानासमोर प्रेक्षकांचा जथ्था थांबला होता. प्रेक्षकांचे मन दुखवायचे नाही म्हणून गॅलरीत येऊन सचिनने अभिवादन केले. पत्रकारांना त्याने फक्त हाय-हॅलो केले. एकाही प्रश्नाचे उत्तर त्याने दिले नाही.
त्यानंतर नियोजित कार्यक्रम लिटिल फ्लॉवर स्कूलचा जाण्याचा होता. काही पालक व विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. विद्यार्थ्यांनी सचिनचे स्वागत केले. शाळेच्या गेटपासून त्याच्यावर गुलाब पुष्पाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला होता.
विक्रमादित्याचे अनोखे स्वागत
सचिनच्या स्वागतासाठी शाळेला सजवण्यात आले होते. स्टेजवर लावलेल्या बॅनरवर, ‘हार्टली वेलकम टू द मॅन हू हॅज मेड डिफरन्स इन इंडिया’ असे लिहिले होते. दहाव्या इयत्तेतल्या प्रतीक व्यंकटेश सपारने सचिनचे 22 बाय 30 आकाराचे सुरेख पोर्ट्रेट तयार केले होते. त्याचे तोंडभरून कौतुक करून विक्रमादित्याने त्यावर सही केली. ती बॅट व सचिनचे पोट्र्रेट आजही महाविद्यालयाने शोकेसमध्ये लावून ठेवले आहे. रवींद्र गायकवाड यांची बहीण डॉ. प्रतिभा यांचे हेरिटेजमध्ये सायंकाळी लग्न होते. त्या लग्नमंडपात हजेरी लावल्यानंतर सचिनने सोलापूरला अलविदा केले.
आई, वडील व शिक्षकांचा आदर करा
लिटिल फ्लॉवर स्कूलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सचिन तेव्हा म्हणाला होता, प्रत्येक विद्यार्थ्याने आई, वडील व शिक्षकांचा आदर केला पाहिजे. सन्मान राखला पाहिजे. तरच जीवनात त्यांच्या आशीवार्दाने आपण यशस्वी होऊ.
सचिनची भेट हा सुवर्ण दिन
रवींद्र गायकवाड हे स्कूलचे माजी विद्यार्थी होते. त्यामुळे आमच्या शाळेला सचिनची भेट झाली. अनेक सन्मान विक्रमाचे मानकरी असलेल्या सचिन तेंडूलकरने 28 ऑगस्ट 2005 रोजी दिलेली भेट हा लिटिल फ्लॉवर स्कूलच्या इतिहासातील सुवर्ण दिनच ठरला. ही आठवण विसरता येणार नाही. ’’ नूतन र्शीकांत कुलकर्णी, सहशिक्षिका