आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2 ऐवजी 4 ब्रासची होते वाळू वाहतूक; अवैध वाळू उपसा व वाहतुकीवरील कारवाई थंडावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वाळू लिलाव करताना जिल्ह्यातील महसूल प्रशासनाने उपसा आणि वाहतूक करण्यासाठी अनेक नियम व अटी घालून परवानगी दिली. नियमांचे पालन काही दिवस झाले. पण आता नियम धाब्यावर बसवून वाहतूक होत असल्याचे दिसत आहे. वाळू वाहतूक करण्याची परवानगी 2 ब्रासची असताना एका ट्रकमध्ये 4 ब्रासपेक्षा अधिक वाहतूक करण्यात येत आहे. परवानगीपेक्षा अधिक वाळू वाहतूक होत असल्याने गावांसाठी असलेले रस्ते खराब होत आहेत. ग्रामस्थांनी याबद्दल तक्रारी करूनही जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी यंदा वाळू चोरी रोखण्यासाठी विशेष असे प्रयत्न करीत वाळू चोरांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्यक्षात लिलावानंतर अनेक नियम ठेकेदारांकडून पायदळी तुडविले जात आहेत. वाळूचा उपसा व वाहतूक सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करावा, एका वाहनामध्ये फक्त दोन ब्रास वाळूची वाहतूक करता येणार असल्याचे बंधनही लादले होते. शिवाय वाळू चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, बारकोड असलेल्या पावत्यांचा वापर करण्यात आला.
प्रकरणाची चौकशी व्हावी
तेलगाव येथील वाळू उपसा करण्याचा ठेका दिला आहे. संबंधित ठेकेदाराकडून अरळी बंधार्‍यावरून 4 ब्रासपेक्षा अधिक वाळू भरून वाहने नेली जातात. अनेक वाहनांकडे पावती न देताच वाळू वाहतूक केली जात आहे. या ओव्हरलोड वाळू वाहतुकीमुळे गावाचा रस्ताही खराब झाला आहे, या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी तेलगाव ग्रामस्थांनी अप्पर जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
त्या ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करू
४वाळूचा ठेका देताना 2 ब्रासपेक्षा अधिक वाळू वाहतूक करू नये, अशी अटच घालण्यात आली आहे. तरीही ठेकेदारांकडून ओव्हरलोड वाळू वाहतूक होत असल्यास संबंधित तहसीलदार, प्रांताधिकारी यांना चौकशीचे आदेश देण्यात येतील. ओव्हरलोड वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यात येईल.’’
शंकरराव जाधव, उपजिल्हाधिकारी, महसूल
आढळल्या बोगस पावत्या
अनेक कारवाईमध्ये ट्रकचालकाकडे बोगस पावत्या आढळून आल्या. यावर महसूल प्रशासनाने एकही ठोस कारवाई केली नाही. उलट तहसीलदार व पोलिस अधिकार्‍यांनी बोगस पावत्या व अधिक वाळू असलेल्या वाहनांना किरकोळ दंडात्मक कारवाई करून वाहने सोडल्याचे समोर आले आहे.