आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूचा ट्रक घरात घुसला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रकचे समोरील चाक निखळल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्यालगत असलेल्या घरात घुसला. या अपघातात दोघेजण जखमी झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घोंगडे वस्ती येथे गुरुवारी पहाटे ही घटना घडली. अपघाताची नोंद जोडभावी पेठ पोलिसात झाली आहे.

शिवशंकर रामकृष्ण सगेल (वय 62, रा. 102 घोंगडे वस्ती, भवानी पेठ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सगेल यांचे घोंगडे वस्तीत रस्त्यालगत घर आहे. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाळूचा ट्रक (एमएच 08 - 8651)भवानी पेठ परिसरातून निघाला होता. घोंगडे वस्ती येथे आल्यानंतर ट्रकच्या समोरील चाक निखळले गेले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वेगाने धावणारा ट्रक सगेल यांच्या घरात घुसला. या अपघातात घरात झोपलेले सगेल यांचे जावई गोवर्धन व मुलगी कुमुदिनी हे दोघे जखमी झाले. वाहनाचा वेग अधिक असल्याने ट्रकने घराची भिंत फोडून शेजारच्या जनरल दुकानाचेही नुकसान केले. अचानक घडलेल्या या प्रकाराने सगेल कुटुंब हादरून गेले.

खड्डय़ामुळे अपघात
रस्त्यावरील खड्डय़ात आदळल्याने ट्रकची दोन चाके निखळली आणि अपघात झाला, असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले आहे. अपघात होताच ट्रक चालकाने पोबारा केला. पुढील तपास भुसनूर करत आहेत.