आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरांच्या आपसातील भांडणाने उघडकीस आली चंदन तस्करी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - चोरांच्या आपसातील भांडणाने रक्तचंदनाची तस्करी उघडकीस आली. औराद (ता. दक्षिण सोलापूर) येथे शेतात कडब्याच्या गंजीत दडवून ठेवलेले तीन हजार 650 किलोंचे रक्तचंदन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी पहाटे जप्त केले. बाजारभावाप्रमाणे चंदनाचे मूल्य 55 लाख रुपये आहे. याप्रकरणी संतोष र्शीशैल कामाठी (रा. चणेगाव, ता. इंडी, हल्ली बुधवार पेठ, अक्कलकोट) व हिरा मल्लप्पा गुजले (रा. बेडर गल्ली, अक्कलकोट) यांना अटक झाली आहे.

तस्करीत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील टोळी कार्यरत आहे. अन्य आरोपींच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथके तयार केल्याची माहिती उपवनसंरक्षक किशोर ठाकरे यांनी दिली.

चौघांचा तपास सुरू
प्रमुख सूत्रधार पुण्यातील टोळी, सोपान, शेख, ख्वाजा व आंध्र प्रदेशातील अण्णा नावाच्या व्यक्तींचा शोध वनविभागातर्फे सुरू आहे. महाराष्ट्रात रक्तचंदनाची झाडं दुर्मिळ असून चंद्रपूर, गडचिरोली परिसरात क्वचित आढळतात. आंध्र प्रदेशातील राखीव जंगलातून ती बेकायदा आणल्याचा संशय आहे. आंध्राच्या सीमावर्ती जिल्ह्यातील वनविभागाशी पत्रव्यवहार सुरू आहे.

चोराच्या पत्नीने दिली भांडणाची फिर्याद
पुण्यातील सोपान याने (पूर्ण नावाची नोंद नाही) रसूल शेख (रा. अक्कलकोट) याला चंदन लपवून ठेवण्यासाठी जागा शोधण्यास सांगितले. त्याने हिराच्या मदतीने तेरामैल (ता. दक्षिण सोलापूर) येथे एक जागा निश्चित केली. त्यासाठी दरमहा दोन लाख रुपये भाडे ठरले. त्यापोटी 30 हजारांची उचल घेतली. 28 ऑगस्टला चंदनाची ओंडकी उतरवण्यात आली. त्याच्या देखभालीची जबाबदारी हिरा व संतोषकडे होती. चंदनाचे मूल्य पाहून त्यांना मोह झाला. संतोषने तेथील चंदन परस्पर उचलून औराद येथील शेतात हलवले. चंदन चोरीस गेल्याची हूल उठवली. दरम्यान, संतोष व हिरा यांच्यामध्ये भांडण झाले. त्यात हिराने संतोषच्या पत्नीला धमकावले. तिने पोलिसांत त्याची फिर्याद दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे ते प्रकरण चौकशीसाठी आले. पोलिस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांच्या पथकाने शोध घेतल्यानंतर चंदनाच्या चोरीचा प्रकार समोर आला. दोघांना ताब्यात चौकशी केली असता खरी हकीकत पुढे आली. वनविभागाच्या मदतीने पोलिस निरीक्षक अशोक देशमुख, साहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब जाधव, विनोद घुगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. त्यात वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब हजारे यांचे पथक सामील होते

रक्तचंदन म्हणजे ?
नेहमीच्या चंदनापेक्षा हे वेगळे असून ते औषधी आहे. त्याच्या गाभ्याचे लाकूड रक्ताप्रमाणे लाल असल्याने त्यास रक्तचंदन नाव आहे. सौंदर्यप्रसाधनांमध्ये याचा प्रामुख्याने वापर असतो. दीड हजार रुपयांना एक किलो दराने याची विक्री होते.

पोलिस कोठडी
दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता, नऊ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायदंडाधिकारी नलगे यांनी दिला. वनोपजाची अवैध तोड, अवैध तस्करी केल्याप्रकरणी वन्यजीव कायदा 1972 अन्वये आरोपींना किमान दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

पाच वर्षांपूर्वीही झाली होती कारवाई, तपास मात्र नाही
पाच वर्षांपूर्वी मंगळवेढा तालुक्यात पोलिसांनी रक्तचंदनाची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक पकडला. त्यामध्ये तब्बल आठ ते दहा टन रक्तचंदनाची ओंडकी जप्त केली होती. कांद्याच्या ट्रकमध्ये लपवून नेत होते. कर्नाटकातून ते आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. वनविभागाच्या गोदामात चंदन पडून आहे. पोलिस तपास मात्र थांबला आहे.