आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसाच्या फडातून जप्त केले 40 लाखांचे रक्तचंदन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - चंदनतस्करांनी उसाच्या शेतामध्ये दडवून ठेवलेले 40 लाख रुपये बाजारमूल्य असलेले रक्तचंदन मंगळवारी (दि. 10) वनविभागाच्या पथकाने जप्त केले. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आढेगाव (ता. माढा) येथे ही घटना घडली. एकूण 224 रक्तचंदनाचे ओंडके मिळाले आहेत. सात हजार किलो त्याचे वजन आहे.

राष्ट्रीय महामार्गालगत शेतातील एका मोठय़ा उसाच्या फडामध्ये दोन ठिकाणी रक्तचंदनाचे ओंडके पडले होते. उसाला पाणी देण्यासाठी गेल्यानंतर संबंधित शेतकर्‍याच्या नजरेस हा प्रकार आढळला. त्याने त्वरित टेंभुर्णी पोलिसांना त्याबाबतची माहिती दिली. टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी वनविभागाला त्याबाबतची माहिती दिली. उपवनसंरक्षक किशोर ठाकरे यांनी त्वरित तपासासाठी पथक पाठवले. साहाय्यक उपवनसंरक्षक सुवर्णा झोळ, मोहोळचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एस. बोकेफोडे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी रक्तचंदनाचे विखुरलेले 224 नग त्यांना आढळले.

शेतकर्‍याकडे त्याबाबतची चौकशी केली. पण, त्याला काहीच माहिती नसल्याचे, चौकशीत आढळले. वनविभागाच्या पथकाने त्या घटनास्थळाचा पंचनामा करून ती ओंडकी जप्त केली. एकूण 224 ओंडकी असून त्याचे वजन 7190 किलो आहे.

तस्करीत आंतरराज्य टोळीचा सहभाग
रक्तचंदन ही महाराष्ट्रातील दुर्मिळ झाडे आहेत. प्रामुख्याने आंध्र प्रदेश, तामीळनाडू, दक्षिण कर्नाटकातील घनदाट जंगलामध्ये ती झाडे जास्त आहेत. तेथूनच रक्तचंदनाची मोठय़ा प्रमाणावर तस्करी होते. या दोन्ही घटनांमध्ये आंतरराज्य टोळीचा सहभाग असल्याचे वनविभगातर्फे सांगण्यात आले.

त्याच टोळीकडे संशयाची सुई
औराद येथे रक्तचंदन लपवून ठेवलेल्या आरोपींकडे माढा येथील घटनेतील संशयाची सुई वळली आहे. वनविभाग त्याच आरोपींना चौकशीसाठी पुन्हा ताब्यात घेण्यात येणार आहे. तसेच, स्थानिक तस्करांचा यामध्ये सहभाग आहे का? याबाबतचा तपास वनविभागाचे पथक करीत आहे.

गेल्या आठवड्यातच औरादमध्ये उघड झाला होता प्रकार
गेल्या आठवड्यात औराद (ता. दक्षिण सोलापूर) कुडले यांच्या शेतामध्ये कडब्याच्या गंजीत लपवून ठेवलेले तब्बल साडेतीन हजार किलो रक्तचंदन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. तसेच, दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. त्या प्रकरणामध्ये आंध्र प्रदेशातील अण्णा, पुण्यातील सोपान व अक्कलकोटच्या रशिद शेखचा प्रमुख सहभाग असून वनविभागाची दोन पथके त्यांचा शोध घेत आहेत.

उसाच्या शेतामध्ये लपवून ठेवलेले चंदन आम्ही ताब्यात घेतले. दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याबाबतचा तपास सुरू आहे. दोन्ही घटनांमध्ये आंतरराज्य चंदन तस्करांचा सहभाग आहे. पहिल्या घटनेतील तीन प्रमुख आरोपींचा शोध लागल्यावर वस्तुस्थिती समोर येईल.’’ किशोर ठाकरे, उपवनसंरक्षक, सोलापूर