आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sangameshwar Education Society Chairman Meghraj Kadadi Passes Away Solapur

सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष मेघराज काडादी यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी, संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मेघराज मडेप्पा काडादी (वय 71) यांचे सोमवारी दुपारी 3.55 वाजता हृदयविकाराने निधन झाले. मंगळवारी सकाळी दहा वाजता देगाव येथील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये 21 ऑगस्ट रोजी त्यांना दाखल करण्यात आले होते. 23 ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका झाला. तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु ते प्रतिसाद देत नव्हते. रविवारी दुपारी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. सोमवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन बहिणी, पत्नी हेमा, कन्या सरिता, पुतणे धर्मराज काडादी व नातवंडे असा परिवार आहे. मेघराज काडादी यांनी शिस्त आणि चिकाटीने सिद्धेश्वर देवस्थान, शिक्षण संस्था, साखर कारखाना आदी संस्थांचा कारभार सांभाळला होता. स्व. अप्पासाहेब काडादी यांचे ते द्वितीय चिरंजीव होत. 13 फेब्रुवारी 1941 रोजी त्यांचा जन्म झाला. बी.ई. (इलेक्ट्रिकल), एलएलबीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. अप्पासाहेबांच्या निधनानंतर 1992 पासून आजतागायत ते सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुराही ते सांभाळत होते. 2006 ते 2011 या पाच वर्षांच्या कालावधीत सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल तसेच सिद्धेश्वर पंगुत्व निवारण केंद्राचे ते अध्यक्ष होते. दैनिक संचारचे व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी कारभार सांभाळला. उर्वरित पान 12

मुंबई-गोवा येथील सिमेन्स कंपनीमध्ये त्यांनी तीन वर्षे सेवा बजावली होती. विजापूर येथील त्यांच्या मालकीच्या कॉटन जिनिंग प्रेसच्या कारभाराची सूत्रेही ते सांभाळत होते. समाजकल्याण केंद्र येथे चिटणीस म्हणून 15 वर्षे काम पाहिले. दीपचंद अनाथालय, पांजरापोळ या संस्थेचे ते सदस्य होते. काडादी हॉस्पिटल, काडादी धर्मादाय निधी या संस्थांचीही धुरा त्यांच्याकडे होती.

मेघराज काडादी यांच्या निधनाचे वृत्त समजताच डफरीन चौकाजवळील ‘गंगा निवास’ या त्यांच्या राहत्या घरी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची गर्दी झाली. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर, सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल, उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण आदींनी शोक व्यक्त केला.