आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सांगोला’, आदित्य शुगर्सवर होणार कारवाई!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - थकबाकी वसुलीसाठी सांगोला सहकारी साखर कारखाना आणि हत्तीज, (ता. बार्शी) येथील आदित्यराज शुगर्स या दोन कारखान्यांवर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार दिलीप माने यांनी दिली. या दोन्ही कारखान्यांचे प्रमुख बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे आता कारवाईकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेने जिल्ह्यातील 10 हून अधिक कारखान्यांना मालतारण कर्ज दिले आहे. त्याचबरोबर संचालकांशी संबंधित असलेले खासगी कारखाने, शैक्षणिक संस्था, इतर खासगी उद्योगांना मोठय़ा प्रमाणावर कर्ज दिले आहे. कर्ज घेणारी आणि कर्ज वसुली करण्याची जबाबदारी असलेली मंडळी एकच असल्याने वसुलीसाठी वेळ लागत आहे. या पार्श्वभूमीवर नाबार्ड बँकेला वेळोवेळी समज देत आहेत. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची आज नियमित सभा झाली. उपाध्यक्ष बबनराव आवताडे, ज्येष्ठ संचालक विजयसिंह मोहिते-पाटील, संचालक भाई एस. एम. पाटील, सुधाकर परिचारक, आमदार दिलीप सोपल, राजन पाटील, संजय शिंदे, सुरेश हसापुरे , अरुण कापसे, डॉ. संजय कांबळे आदी उपस्थित होते. विषय पत्रिकेमध्ये सांगोला सहकारी साखर कारखाना आणि आदित्य शुगर्स या दोन्ही कारखान्यांकडील थकबाकी वसुलीसाठी कारवाई करण्याचा मुद्दा होता. थकबाकी वसुलीच्या विषयावर संचालकांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर दोन्ही कारखान्यांकडील थकबाकी वसुलीसाठी कारवाई करण्याचा निर्णय झाला. यावेळी काही संचालकांनी पीक कर्ज वाटप तत्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी केली.

सांगोला आणि आदित्य दोन्ही कारखान्यांचे प्रमुख जिल्हा बॅंकेचे संचालक आहेत. त्यामुळे बॅंक नेमकी कोणती कारवाई करणार याकडे आता लक्ष राहणार आहे.


दोन्ही संस्थांचे प्रमुख बँकेचे संचालक
25 मे पासून पीक कर्ज वाटप
जिल्हा बँकेने जिल्ह्यातील साखर कारखान्यांना मोठय़ा प्रमाणावर मालतारण कर्ज दिले आहे. सध्या साखर विक्री नसल्याने कारखान्यांनी नियमित थकबाकी भरलेली नाही. बँकेचे अध्यक्ष दिलीप माने यांनी जानेवारीपासून पीक कर्ज वाटप सुरू होईल, असे सांगितले होते. मात्र, अद्यापही पीक कर्ज वाटप सुरू झालेले नाही. यासंदर्भात विचारले असता, माने यांनी 25 मे पासून कर्ज वाटप सुरू होईल, असे सांगितले.

ही तर नियमित थकबाकी
आदित्य शुगरने जिल्हा बँकेकडून छोटे कर्ज घेतले आहे. शिवाय आमची थकबाकी नियमित आहे. नियमित वसुलीसाठी अशाप्रकारची नोटिसा देणे किंवा इतर प्रकारची कारवाई होत असते. अरुण कापसे, प्रमुख, आदित्य शुगर्स, हत्तीज

वकिलांचा सल्ला घेणार
नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात मी थकबाकीदारांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. आता या दोन कारखान्यांवर कारवाईसाठी प्रथम वकिलांचा सल्ला घेणार आहोत. त्यानंतर कारवाईचे स्वरूप सांगता येईल. आमदार दिलीप माने, अध्यक्ष, जिल्हा बँक.