आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjiv Pimparkar Article About Solapur Mayor Chandrakant Gundewar, Divya Marathi

विकासाचे मारेकरी, सोलापूरचे वाटेकरी; महापालिका आयुक्त गुडेवार यांची बदलीची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापुरात काही चांगली कामे करण्यासाठी धडपडणारे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना पाणी प्रश्नाच्या मुद्दय़ावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी हैराण करण्याच्या एक कलमी कार्यक्रमाला कंटाळून गुडेवार यांनी शासनाकडे सोमवारी बदलीची मागणी केली. शासनाच्या आदेशाची वाट न बघता आयुक्त पदाचा कार्यभार सोडत त्यांनी सोलापूरचा निरोप घेतला. 1 मे रोजी सुवर्ण महोत्सवी वाटचाल पूर्ण करणार्‍या सोलापूर महापालिकेच्या इतिहासातील हा एक काळा दिवस आहे. खरे तर पालिकेसारख्या कुठल्याही मोठय़ा संस्थेच्या वाटचालीत एका व्यक्तीच्या येण्यामुळे किंवा जाण्यामुळे फार मोठा फरक पडू नये. कामे करण्याची एक शिस्तबद्ध पद्धत किंवा घडी (सिस्टिम) निर्माण झाली पाहिजे. कोणतीही ‘सिस्टिम’ बसू न देता ‘आम्हाला हवी ती कामे, हव्या त्या पद्धतीनेच करा’, अशी ‘सिस्टिम’ राबवणार्‍या महापालिकेतील दुढ्ढाचार्य नेत्यांना गुडेवारांसारखा धडाकेबाज अधिकारी कधीच झेपणार नाही. पण लोकशाहीत ठोकशाही पद्धतीने कामे रेटणार्‍या नेत्यांना काय वाटते, यापेक्षा सोलापूरच्या हिताचे काय आहे? सामान्य सोलापूरकरांना काय वाटते? हे सर्वप्रथम महत्त्वाचे आणि तेच गुडेवार करीत होते. त्यांनी आजवर जी कामे केली त्यामुळे दुखावलेल्या नेत्याच्या, कार्यकर्त्यांच्या मनात बोचणारी सल निश्चितच आहे.
गुडेवारांनी सोलापुरातून जावे यासाठी खटपटीला लागलेल्या नगरसेवकांच्या फळीनेच गेल्या काही दिवसांपासून गुडेवारांना पाणी प्रश्‍ननावरून हैराण करण्याचे, घेरण्याचे प्रयत्न सुरू केले होते. आयुक्तांच्या दालनासमोरच घोषणाबाजी करीत धरणे धरणार्‍या नगरसेवकांच्या मनातला कावा हा पाणी प्रश्‍ननापेक्षा पालिकेत मावा मिळायचे थांबल्याने त्यांना दूर करण्याचा होता. पाण्याचा प्रश्‍नन हा सोलापूरकरांसाठी महत्त्वाचा आहेच. तो सोडवण्याची जबाबदारी असलेले लोकप्रतिनिधी व प्रशासन या दोघांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. ते राहिले बाजूला; पण पाणीप्रश्‍ननाच्या सोडवणुकीसाठी काम करू पाहणार्‍या गुडेवारांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचेच प्रयत्न काँग्रेसच्या मुख्य नेत्यांनी आणि त्यांच्या धंदेवाईक नगरसेवक चेल्यांनी केले. टेंभुर्णी येथील सुरळीत वीजपुरवण्यासाठी एक्स्प्रेस फीडरची समस्या संपवण्याकरिता गुडेवारांनी पालिकेच्या सभेसमोर जानेवारीत विषय पाठवला होता. पण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यास मंजुरी लगेच दिली नाही. विलंब केला या विलंबामुळे उजनीत पाणी असताना सोलापुरात पाण्याचा प्रश्‍नन जाणवत आहे. वास्तविक सोलापुरात असमान पाणी पुरवण्याची समस्या ही आजची नाही. पाण्याचा प्रश्‍नन गेल्या वर्षीही होता. खरे तर गतवर्षी यापेक्षाही वाईट स्थिती होती. असमान पाणी वाटपाची समस्या ही काही गुडेवार आल्यानंतरच निर्माण झाली आहे असे नाही, तर कोठे कंपनी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तमाम सत्ताधारी नगरसेवकांच्या नाकर्तृत्वाचे ते फळ आहे. राज्याच्या जीवन प्राधिकरणाचे पालक सचिव मोपलवार सोलापुरात आले होते. तेव्हा पाणी प्रश्‍ननाचे रडगाणे त्यांच्यासमोर मांडल्यानंतर मोपलवार यांनी महापालिकेची अब्रू काढली होती. ‘तुमच्या केसातला गुंता काढण्यासाठी तुम्ही शेजारणीला बोलवणार का?’ असा हेटाळणी करणारा शेरा मारला होता. पालिकेच्या केसातील गुंता काढण्याचे काम महेश कोठे आणि त्यांच्या चेल्यांना आजवर जमले नाही. जे गुंता काढू पाहत होते त्यांना काम करू दिले नाही. अशाने उजनीत पाणी असताना सोलापूरचा पाणीप्रश्‍न सुटणार कसा?
गुडेवारांविरुद्ध पाण्यावरून हल्लाबोल करताना त्यांचा हेतू शुद्ध नाही पाण्यावरून तो गेल्या वर्षभरातील सुडाचा प्रवास आहे. सुशील रसिक सभागृह, महापौर अलका राठोड यांचे बेकायदा बांधकाम, सार्वजनिक मुतारी पाडून नवी पेठेत बेकायदा दुमजली दुकान बांधणार्‍यांना गुडेवारांनी दिलेली नोटीस व त्यामुळे दुखावलेले चेतन नरोटे, दिलीप कोल्हे आदींच्या इभ्रतीला धक्का लागल्याने ही मंडळी गुडेवारांच्या विरोधात एकत्र आली. आम्ही मुतारी पाडू किंवा महापालिकेची शाळा बळकावू तुमच्या बापाचे काय जाते? तुम्ही गप्प बसा, असे वाटणार्‍या नगरसेवकांचा गुडेवारांना विरोध आहे. सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या गोष्टी घडत होत्या. पालिकेत जी झुंडशाही चालू होती ती मोडून काढण्याचा प्रयत्न गुडेवारांचा होता. या झुंडशाहीच्या मागे असलेले लोक सोलापूरच्या विकासाचे मारेकरी आहेत. सोलापूर अगदी वाटून घेतल्यासारखे हितसंबंधी कामे त्या त्या भागातील सत्ताधारी नेते मंडळी करीत आहेत.
सोलापूर महापालिकेत कधीतरी चुकून एखादा चांगला अधिकारी येतो. जेव्हा जेव्हा धडाकेबाज काम करणारे अधिकारी आले तेव्हा अशा मुजोर प्रवृत्तीच्या नेत्यांनी, नगरसेवकांनी त्यांना विरोध करीत हुसकावून लावले. अर्थात सुंदरमपासून गुडेवारांपर्यंत अशी मोजकीच उदाहरणे आहेत. पण गुडेवार यांनीही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे चांगले काम करणार्‍यांना हैराण करण्याचा प्रयत्न हा या ना त्या प्रकारचे होणारच. सोलापूर महापालिकेचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुडेवार यांनी आपल्या समोर नागपूर व ठाण्याला सुंदर बनवणारे आयुक्त चंद्रशेखर मला व्हायचे आहे, असे म्हटले होते. चंद्रशेखर यांनाही तेथील नगरसेवकांनी, नेत्यांनी त्रास दिला होताच. पण तो मोडून काढत त्यांनी दोन्ही शहरे सुंदर केली. सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने खलप्रवृत्तीच्या नेत्यांना तोंड देण्याची खंबीरता त्यांनी दाखवायला हवी होती. विधानसभा निवडणूक जवळ येत असताना पाणीप्रश्‍ननासारखे विरोधाचे प्रकार वाढणारच.
सोलापूर सोडते वेळेस पत्रकारांशी बोलताना गुडेवार म्हणाले, ‘मला राजकीय पाठबळ मिळत नाही’. गुडेवार यांना आयुक्तपदी आणणार्‍या गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीच त्यांच्या खुर्चीखालचा आधार काढून घेतला आहे, असा त्याचा अर्थ आहे. याची जाणीव झाल्यानंतरच गुडेवार यांनी पदभार सोडण्याचा निर्णय घेतला असावा. चंद्रशेखर यांनी नागपूर, ठाण्यात काम करताना स्थानिक व मुंबईतील नेत्यांचा आधार त्यांना होता. त्यामुळे त्यांनी स्थानिक विरोध मोडून काढत दोन्ही शहरे सुंदर केली. शिंदे यांनी हे लक्षात घ्यायला हवे होते. गुडेवार हे सत्ताधार्‍यांना झेपणारे नव्हतेच तर लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना सोलापुरात आणलेच का? असा प्रश्‍नन सोलापूरकरांनी विचारला तर त्याला काय उत्तर आहे? चांगल्या अधिकार्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याची पद्धत अशीच असेल तर सोलापूरचा विकास होणार तरी कसा? अशा चांगल्या अधिकार्‍यांच्या पाठीशी सर्वसामान्य सोलापूरकरांनीच उघडपणे उभे राहण्याची गरज आहे.