आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहितेंच्या मानपानामुळे रिंगण सोहळ्यास विलंब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज (जि. सोलापूर) - जगद्गुरू संत तुकोबांच्या पालखीचे जिल्ह्यातील पहिले उभे रिंगण शनिवारी माळीनगर येथे झाले. शुक्रवारी अश्वावरून अकलूज येथे झालेल्या मानापमानाच्या नाट्यानंतर प्रतापसिंह मोहिते यांचा अश्व शनिवारी या रिंगणात धावला. परंतु रिंगण सोहळ्यास दिरंगाई झाल्याने वारकर्‍यांत प्रचंड नाराजीचा सूर उमटला.

अकलूज येथील मुक्काम आटोपून हा पालखी सोहळा सकाळी साडेआठच्या सुमारास माळीनगर येथे आला. या ठिकाणी होणार्‍या उभ्या रिंगणात माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते व जयसिंह मोहिते यांचे दोन्ही अश्व पळवण्याचा संकल्प विश्वस्तांचा होता. शुक्रवारी अकलूज येथील रिंगणात प्रतापसिंह मोहिते यांचा अश्व धावला नव्हता. शनिवारी मात्र विश्वस्तांनी ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रिंगण सोहळा तासभर रेंगाळला होता. मानाचा बाभूळगावकरांचा अश्व धावल्यानंतर प्रतापसिंह मोहिते यांचा शौर्य व जयसिंह मोहिते यांचा चेतक हे अश्व रिंगणातून धावले. त्यानंतर रिंगण सोहळा पूर्ण झाला.

माळीनगर येथे सासवड माळी कारखान्याचे उपाध्यक्ष विलास इनामके, संचालक वसंत ताम्हाणे, परेश राऊत यांनी स्वागत केले. माळीनगर येथील विसाव्यानंतर माढा विधानसभा मतदारसंघाच्या सीमेवर महाळुंग गट नंबर दोन येथे आमदार बबनराव शिंदे यांनी स्वागत केले. त्यानंतर तांबवे, लवंग येथील स्वागत स्वीकारत हा पालखी सोहळा महाळुंग येथे आला. या ठिकाणी सहकारमहर्षी कारखान्याचे अध्यक्ष रामचंद्र सावंत-पाटील, सरपंच ऊर्मिला सावंत-पाटील, उपसरपंच अनिल जाधव यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्या अरुणा धोंगाणे-जाधव, नानासाहेब मुंडफणे, भगवान रेडे यांनी स्वागत केले. दरम्यान, पालखी सोहळ्यात मानपानाच्या नाट्यामुळे वारकर्‍यांत नाराजी पसरली आहे. पुन्हा असे प्रकार होऊ नयेत, अशी चर्चा दिवसभर येथे होती.

वारकर्‍यांमध्ये नाराजी
अश्व येण्यास उशीर झाल्याने शनिवारचे उभे रिंगण काही काळ खोळंबले होते. त्यामुळे वारकरी बांधवांच्या न्याहारीला उशीर झाला. या दिरंगाईमुळे थोडीशी नाराजी होणे साहजिकच आहे. परंतु दोन्ही मोहिते बंधूंचे अश्व येथे धावल्याने कालच्या मानापमान नाट्यावर पडदा पडला आहे. - सुनील महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख

(फोटो - संत तुकाराम महाराजांची पालखी शनिवारी माळीनगर येथे आल्यानंतर अश्वाचे उभे रिंगण मोठय़ा उत्साहात पार पडले. या वेळी तुकोबांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला)