आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satellite Survey Of Solapur News In Marathi, Divya Marathi

उपग्रहाद्वारे मिळकतींच्या सर्वेक्षणाचा दुसरा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील मिळकतींमधील अफरातफर आणि करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेपुढे तातडीचा प्रस्ताव आणला आहे. त्यावर शनिवारी चर्चा अपेक्षित आहे. प्रत्येक मिळकतीचे डिजिटल फोटो काढून जीआयएस प्रणालीनुसार सव्र्हे करण्याची ही योजना आहे.

योजना प्रत्यक्षात आल्यास प्रत्येक मिळकतीस युनिक कोड मिळणार असून, त्याआधारे ऑनलाइन टॅक्स भरण्याची सुविधा महापालिकेकडून देण्यात येईल. जीआयएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. या सव्र्हेसाठी सुमारे सात कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक असल्याने मंजुरी मिळावी म्हणून आयुक्तांनी तातडीचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला आहे. दरम्यान, 2006 च्या सव्र्हेक्षणाचे काम झाले नाही. त्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक प्रा. पुरणचंद्र पुंजाल यांनी केली होती. पण पुढे काहीच झाले नाही.
जीआयएस प्रणालीनुसार मिळकतींना युनिक कोड देण्याचा प्रस्ताव तातडीचा आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा होईल किंवा नाही, याबाबत शंका आहे.

काय आहे या प्रणालीत

  • मिळकतींचे सर्वेक्षण करून युनिक कोड तयार करण्यात येईल.
  • मालमत्तेचे तांत्रिक सर्वेक्षण आणि माहिती, संगणकृत नकाशे तयार करण्यात येतील.
  • प्रभागनिहाय मालमत्तेचे डिजिटल फोटो काढणे, मालमत्तेचे सर्वेक्षण अहवाल तयार करणे, नकाशे व फोटो
  • डाटाबेस तयार करणे.
  • जीआयएस प्रणालीनुसार करमूल्य झोन नकाशा तयार करणे, करमूल्याचे ऑनलाइन डाटाबेस तयार करणे आणि ऑनलाइन मालमत्ता कर भरणा प्रणाली आणणे.
  • मिळकतीचे साईड व फ्रंट मार्जिन मोजणी करून माहिती संकलित करणे.


उत्पन्नात मोठी वाढ
जीआयएस प्रणालीमुळे आपोआप टॅक्स आकारणी होईल. कर्मचार्‍यांकडून नागरिकांची होणारी पिळवणूक थांबेल. त्यामुळे महापालिकेला दरवर्षी सुमारे 75 कोटी तर सुरुवातीला 400 कोटींचे उत्पन्न मिळेल, अशी माहिती महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सभागृहात दिली.

लोकांना फायदा
जीआयएस प्रणालीनुसार शहरातील प्रत्येक मिळकतीस युनिक कोड मिळाल्यास त्यावरून ऑनलाइन टॅक्स आणि महापालिकेचे इतर कर भरणे शक्य होईल. मिळकत शोधणे सोयीचे होईल. सोलापुरात मिळकतीचा टॅक्स इतर शहरांतूनही भरता येईल.

यापूर्वी बोजवारा
मिळकतींचे सर्वेक्षण, रस्ते, पाणी आणि ड्रेनेजच्या पाइपलाइनचा सर्व्हेक्षण करण्यासाठी 2006 मध्ये 1.27 कोटीच्या कामास मंजुरी दिली होती. स्थानिक स्वराज्य संस्था, पुणे या संस्थेस काम देण्यात आले. त्यांना सुमारे 90 लाख रुपये दिले. पण ती प्रणाली यशस्वी झाली नाही.

शहरातील मिळकतींची सध्यस्थिती
शहर - 80 हजार 81
हद्दवाढ - 81 हजार 116
गवसु - 35 हजार
एकूण - एक लाख 96 हजार 197 (सन 2012-13 च्या माहितीनुसार)