आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satyanarayan Puja Organised In Governmental Office

शासकीय कार्यालयात अधिका-यांनी घातला सत्यनारायण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - वस्त्रोद्योग खात्याचे प्रादेशिक उपसंचालक अशोक भांडवलकर 31 जुलैला निवृत्त होत आहेत. त्यानिमित्त कार्यालयात सोमवारी सत्यनारायण महापूजा झाली. त्यानंतर तीर्थ-प्रसाद नव्हे; तर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. शासकीय कार्यालयात झालेल्या या प्रकाराचा काहींनी निषेध नोंदवला.


कविमनाचे अधिकारी असलेले श्री. भांडवलकर 2006 मध्ये सोलापूरला सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक म्हणून रुजू झाले. 2009 मध्ये वस्त्रोद्योग खात्याचे प्रादेशिक उपसंचालक म्हणून त्यांची बदली झाली. या खात्याचे मुख्य कार्यालय सोलापूर असल्याने ते येथेच रमले. कर्तव्यात कठोर आणि साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत वावर असल्याने त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘अविष्य असंच जगायचं असतं..’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोलापुरातच झाले होते. एक पुरोगामी विचारांचे अधिकारी म्हणूनही त्यांनी ओळख निर्माण केली; परंतु सोमवारच्या सत्यनारायणाने या प्रतिमेला धक्का बसला. त्यांच्याच खात्यातल्या काही कर्मचार्‍यांनी माध्यमांकडे निषेध नोंदवला.


घटनाविरोधी कृत्य
सरकारी कार्यालये सार्वजनिक ठिकाणे असतात. तिथे देव-देवतांची पूजा करता येत नाही. राज्याच्या मुख्य सचिवांनी महापुरुषांच्या प्रतिमाच कार्यालयांमध्ये ठेवण्याचे आदेश दिले. परंतु त्याचे उल्लंघन होत असून, आता महापूजाच सुरू झाल्या. ही बाबच घटनाविरोधी आहे. ज्याला देव-धर्म करायचे आहे, त्यांनी घरीच करावे.’’ राजा सरवदे, रिपब्लिकन पक्षाचे नेते

ही प्रथाच पडेल ना!
शासकीय कार्यालयांमध्ये देवपूजा चालत नाही. सहकार खात्यात गणेशोत्सव चालायचा. ती प्रथा आम्ही बंद केली. आता सत्यनारायण महापूजा म्हणजे कहरच झाला. या पुढे अशीच निवृत्तीनंतर सत्यनारायणाची प्रथा पडेल.’’ शाहू काटे, सहकार अधिकारी

कर्मचार्‍यांच्या भावना
निवृत्तीनंतरचा काळ चांगला जाण्यासाठी कर्मचार्‍यांनी ही पूजा केली. ही बाब सर्मथनीय नाही; परंतु त्यांच्या भावना आहेत. म्हणून मी काही बोललो नाही. एकत्र जेवले तरी कामात खंड पडू दिला नाही. ’’ अशोक भांडवलकर, प्रादेशिक उपसंचालक