आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्याच्या आधारावर समर्थ समाज घडवू; संमेलनाध्यक्ष डॉ. कुंभार यांचे प्रतिपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सत्याच्या आधारावर स्वयंभू, समर्थ आणि आत्मविश्वासपूर्ण समाज उभा करणे हाच ‘सत्यशोधक’चा अर्थ असल्याचे ओबीसी साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार (कोल्हापूर) यांनी सांगितले. शनिवारपासून (दि. 9) सुरू होणा-या सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलनासाठी त्यांचे शुक्रवारी सकाळी आगमन झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अखिल भारतीय साहित्य संमेलनाला टीकेचे ‘लक्ष्य’ करून त्यांनी, बहुजन साहित्याकडे लक्ष वेधले. आम्ही दंगा, उत्सव करत नाही. तसे काही करून राजकारण करणार नाही, अशा शब्दांत त्यांनी प्रस्थापित साहित्यिकांच्या संमेलनांतील प्रकारांचे वाभाडेच काढले. साडेपाचशे लोकांचे होणारे संमेलन म्हणजे राजकीय विधाने असतात, या मतावर मी ठाम असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शब्दांत जग उलथून टाकण्याची ताकद असते; परंतु या शब्दांवर काहींची मक्तेदारी होती. बहुजन घटकांच्या शब्दांना किंमत नव्हती. त्यांच्या शब्दांना साहित्य म्हणून स्वीकारलेच गेले नाही. वेद, मंत्र, ब्राह्मण सर्वश्रेष्ठ ठरले. परंतु मंत्राने काही होते का? काही करण्यासाठी माणसे लागतात. ही माणसे कृती करतात. त्याला नाम, क्रियापदे, विशेषणे जोडली जातात. त्यातूनच भाषेचा जन्म होतो. सुतार, शिंपी, कोष्टी, कुंभार या माणसांनी अशाच कृतीतून काही शब्द आणले. ते स्वत:च्या शब्दांनी लिहितात. उसने घेत नाहीत. ते साहित्य नाही का? अशा भाषेतून त्यांची दु:खे येत असतील तर त्यांना नाकारायचे का? समतावादी घटनेत त्यांचा कोणीच विचार करत नाही, त्याासाठी कुठली धोरणे नाहीत. त्यामुळे हे घटक उपेक्षितच राहिले, अशी खंत डॉ. कुंभार यांनी व्यक्त केली.
साध्या पद्धतीने स्वागत : शुक्रवारी दुपारी 12 वाजता मुरारजी पेठेतील हॉटेल वैष्णवीमध्ये डॉ. कुंभार यांचे आगमन झाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष युवराज चुंबळकर, मुख्य निमंत्रक प्रा. राजन दीक्षित, हनुमंत उपरे, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश उपाध्यक्ष राजा सरवदे यांनी त्यांचे स्वागत केले. अत्यंत साध्या पद्धतीने हा स्वागत समारंभ झाला. सत्यशोधक पद्धतीनेच समारंभ झाला पाहिजे, असा आग्रह डॉ. कुंभार यांनी संयोजकांकडे धरला.
जोतिबा फुलेनगरी सजली : रंगभवन येथे होणाºया संमेलन स्थळाला ‘क्रांतिबा जोतिबा फुले साहित्यनगरी’ असे नाव देण्यात आले आहे. शनिवारी सकाळी नऊला संविधान दिंडी झाल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यासाठी संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष खासदार शरद यादव येत आहेत. महापौर अलका राठोड, ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार, कविवर्य डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली, आमदार दिलीप माने, विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम आदी प्रमुख पाहुणे आहेत. उद्घाटन सत्रातच सत्यशोधक पुरस्कारांचे वितरण होईल. त्यानंतर महात्मा जोतिबा फुले यांच्या नातसून नीता होले यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे.

आज संमेलनात
>परिसंवाद एक : दुपारी 2 ते 3.30 :
>विषय : हिंदू ओबीसींचा मूळ धर्म, ग्रंथ व गुरू कोणता? परिवर्तन आणि विपर्यास
>सहभाग : ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड, जेमिनी कडू, ओमप्रकाश मौर्य, शशिकांत चव्हाण
>प्रकट मुलाखत : दुपारी 3.30 ते 5.00
>सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांची मुलाखत
>विषय : ओबीसीला पर्याय धर्मांतर
>एकपात्री प्रयोग : सायंकाळी 6.00
>मी गाडगेबाबा बोलतोय!
>सादरकर्ते : संभाजी पालवे
>सत्यशोधकी जलसा : रात्री 8.30
>सादरकर्ते : बनसोडे गुरुजी आणि केशव बडे
>निमंत्रितांचे कविसंमेलन : रात्री 10