आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसी साहित्य संमेलन : कर्मकांड गाडून टाका!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महिलांच्या प्रगतीला अडसर ठरणार्‍या कर्मकांडांना गाडून टाकण्याची हाक चळवळीतल्या महिलांनी रविवारी दिली. सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलनात ‘हिंदू महिलांचे कर्मकांड : शोकांतिका की प्रगतीतील अडसर’ या विषयावर परिसंवाद झाला.

हक्कासाठी संघर्ष करा

उषा दराडे : कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी संघर्ष करावाच लागतो. हक्क आणि अधिकार मिळवून घेण्यासाठी महिलांना संघर्ष करावाच लागेल. हिंदू धर्मातील मागासवर्गातल्या महिला कर्मकांडातच अडकल्या. अंगारे, धुपारे, व्रतवैकल्ये यातून त्यांच्या खर्‍या हक्कांची जाणीव होणार कधी?

स्त्रीजन्मापासूनच गुलाम

सुनीता रेणके :गर्भधारणा झाल्यानंतर ‘पुत्ररत्न’ होणार असे गर्भसंस्कार स्त्रियांवर होत असतात. त्यामुळे स्त्री जन्मापासूनच गुलाम होते. विविध कर्मकांडामध्ये त्यांच्या शारीरिक क्षमतेचे खच्चीकरण होते. असलेल्या क्षमतेचा वापरच होत नाही. त्यामुळे स्त्रिया दुसर्‍यांवर अवलंबून असतात. त्यांनी जर अर्थकारण समजून घेतले तर त्यांचे परावलंबित्व दूर होईल. त्यासाठी स्त्रियांनी एकत्र यावे. परंतु व्यवस्था त्यांना एकत्र येऊच देत नाही. कारण व्यवस्थेला स्त्रीशक्ती माहीत आहे.

पुरुषांसाठी कुठले व्रत

प्रा. ज्योती वाघमारे : हिंदू धर्मातील सर्व व्रत फक्त स्त्रियांसाठीच आहेत. पुरुषांसाठी एकही नाही. वटपौर्णिमेला सातजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वडाच्या झाडाला स्त्रिया पूजतात. तो कसलाही असला तरी ही पूजा करावीच लागते. ही केवळ गुलामी आहे. आम्ही सत्यवानाच्या सावित्रीची नव्हे, तर सावित्रीबाई फुले यांच्या कन्या आहोत. त्यांनी आम्हाला शिक्षण दिले, जगण्याचे बळ दिले. त्यांचीच पूजा आम्ही करणार.

आता बस्स झाले.!

रमणी सोनवणे : पुरुषी अहंकाराने महिलांवर आलेली बंधने झुगारण्याची वेळ आता आलेली आहे. प्रथम महिलांनी कर्मकांडातून बाहेर पडावे. स्वत:ला सिद्ध करावे. मुले जन्माला घालताना मुलगीच हवी म्हणून हट्ट करावा. समान अधिकार, समान न्याय मिळवून घ्यावे. त्यासाठी स्त्रियांना संघर्षच करावा लागेल.

ओबीसींनी आपली गुणवत्ता वाढवावी; जागतिकीकरणाच्या परिणामांवर उपाय

डॉ. प्रल्हाद वडगावकर : ओबीसी समाजाने एकत्र येऊन जागतिकीकरणाविरोधात मोठी चळवळ उभी केली पाहिजे. राज्यघटनेने दिलेले आरक्षण मिळू नये म्हणून खासगीकरणाचा अडसर आणला. आरोग्याच्या क्षेत्रातील खासगीकरणही खूपच घातक आहे. एकीकडे मुले कुपोषणाने मरत आहेत आणि दुसरीकडे करोडपतींची संख्या वाढत आहे.
बापू राऊत : आयात व निर्यात हा जागतिकीकरणाचा गुणधर्म आहे. उत्पादनाची गुणवत्ता एवढाच निकष लावला जातो. म्हणून आपली गुणवत्ता आपणच वाढवली पाहिजे. आपल्या अडचणी ओबीसी आमदारांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.

प्रा. राजेंद्र कुंभार :मोहेंजोदडो काळापासून भारत देश अव्वल क्रमांकावर होता. कच्च्या मालापासून पक्का माल बनविणारे कलावंत होते. लोहारा, सुतारवाडी, कुंभारगाव ही नावे बलुतेदारांच्या प्रभावामुळे पडली. आता गुणवत्ता मोजण्याची मोजपट्टी बदलणे गरजेचे आहे. ही आर्थिक, सामाजिक लढाई आहे.