आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावित्रीच्या लेकींनी घडवले मोती; शिक्षणाची गोडी लावण्यासाठी अनोखा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आपल्या पगारातून शक्य तेवढी रक्कम जमा करून, इतरांची मदत घेऊन शाळेतील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना गणवेशासह सर्व शालेय साहित्य देऊन शिक्षणाची गोडी लावली. शिक्षकांकडून होत असलेली मदत पाहून आपल्याच वर्गातील मित्रांना मदत करण्याची भावना शालेय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. माणुसकीचे हे उत्तम उदाहरण एम. ए. पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये पाहण्यास मिळत आहे.
...अन् मिळाले माणुसकीचे धडे
दरवर्षी शिक्षकांकडून होत असलेली मदत पाहून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मदतीची भावना निर्माण झाली. गरजू विद्यार्थ्यांना वर्गमित्र मदत करत आहेत. एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला समजू नये हा विचार विद्यार्थ्यांनी अंगीकारल्याचे दिसून येते.

जकातीचापैसा भवितव्यासाठी रमजानमहिन्यात जकात देणे मुस्लिम बांधवांमध्ये अनिवार्य आहे. यातील पैसे काढून गरजूंना दिले जातात. पानगल हायस्कूलमधील शिक्षिका आपल्या सासरच्या मंडळींची समजूत काढत स्वत:च्या आणि नातेवाइकांच्या जकातीचा पैसाही विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता वापरत आहेत.

महिलांना त्यांच्या मनाची ताकद सावित्रीबाईंनी करून दिली आणि समाजाचा कायापालट झाला. आज शिक्षण घेण्यात मुस्लिम मुलींची संख्या वाढत आहे. मोठ्या आशेने मुलांना शाळेत पाठवले जाते. मात्र, शिक्षणाचा खर्च पाहून अवघ्या सहा महिन्यांतच त्यांचे शिक्षण थांबवण्यात येते. ही परिस्थिती पानगल हायस्कूलमधील काही शिक्षिकांच्या लक्षात आली. सर्व मुलांनी शिक्षण घ्यायला हवे, प्रगती करायला हवी या विचाराने त्या शिक्षिकांनी २००९ पासून गरजू मुलांना मदत करण्यास सुरुवात केली.
ही मदत फार गाजावाजा करत होत नसली तरी फार काळ लपू शकली नाही. मदतीची भावना सर्व शिक्षकवर्गापर्यंत पोहोचली. त्यावेळी चर्चेतून सर्व मदत एकवटायची आणि गरजूंची यादी तयार करून त्यांच्यापर्यंत ती पाेहोचणे असा निर्णय झाला. प्रारंभी चाळीस हजार रुपये जमा झाले. त्यातून विद्यार्थ्यांना गणवेशासह सर्व शालेय साहित्य देण्यात आले.

हायस्कूलमधील शिक्षिकांनी पुढाकार घेत मदतीची संकल्पना पुढे आणली. शिक्षिकांच्या या संकल्पनेला सहकार्य म्हणून शिक्षकांनीही आपली पावले पुढे टाकली. दरवर्षी जमा होत असलेल्या रकमेत वाढ होत यावर्षी दोन लाख ९८ हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे. या रकमेतून शालेय साहित्य वाटप केले जाते.

परंपरा आजही
^खर्चामुळे अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे २००९ पासून आम्ही काही शिक्षिका मिळून पगारातून काही रक्कम काढत विद्यार्थ्यांना मदत करत आहोत. ती परंपरा आजही आहे आणि पुढेही चालवायची इच्छा आहे. सुरैय्या जहागीरदार, शिक्षिका

विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता मदत
^दरवर्षी एक रक्कम जमा केली जाते आणि ती विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता वापरली जात आहे. रमजान महिन्यातील जकातीचा पैसाही आम्ही विद्यार्थ्यांवर खर्च करतो. सर्व शिक्षिकांनी अशी मदत केल्यास सर्व समाज शिक्षित होईल. सदफशेख, शिक्षिका