आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर भरूनही सुविधा, स्थिरतेचा आहे अभाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे स्टेशनहून डीआरएम ऑफिसकडे जाणार्‍या रस्त्यावर भाजीमंडई आहे. फॉरेस्ट परिसरातील चांदणी चौकापासून ते डीआरएम कार्यालयापर्यंत जागा बदलत येथील भाजीमंडई गेल्या चाळीस वर्षांपासून भरत आहे. महापालिकेने या फिरत्या मंडईला अद्यापही कायमची जागा उपलब्ध करून दिली नाही. फुटपाथवर बसून याठिकाणी भाजीविक्री केली जाते.
पूर्वी फॉरेस्ट येथील चांदणी चौकात भाजीमंडई भरत होती. या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्यामुळे महापालिकेने जुना एम्प्लॉयमेंट चौकात सह्याद्री शॉपिंग सेंटरच्या आत मंडई सुरू करून दिली. मात्र या ठिकाणी भाजीविक्री आणि खरेदीसाठी कोणी येईना. त्यानंतर रेल्वे स्टेशनजवळून जाणार्‍या नाल्याच्या रस्त्यावर मंडई सुरू झाली. या ठिकाणी बरीच वष्रे भाजीविक्री केली जात होती. परंतु याचा फटका सह्याद्री शॉपिंग सेंटरमधील मंडई बसून कालांतराने येथील मंडई ओस पडली. काही वर्षांनंतर रेल्वे स्टेशन परिसरातील ही मंडई हलवून डीआरएम ऑफिस रस्त्यावरील नाल्याच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत भाजी मंडई सुरू झाली. कुमार चौक, वाडिया हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन परिसरापर्यंत ही मंडई पसरलेली आहे.
सकाळी भरतो बाजार
या मंडईमध्ये सध्या भाजीविक्रेत्यांची संख्या वाढली आहे. ग्रामीण भागातील लोक रेल्वेने येऊन सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत भाजीविक्री करतात. कमी दरात ताजी भाजी मिळत असल्याने येथे सकाळी गर्दी होते.
मनपाची कर वसुली
नाल्याच्या बाजूला मोकळ्या जागेत वसलेल्या या मंडईतील विक्रेत्यांकडून महापालिका मंडई विभाग दररोज आठ रुपये कर वसूल करते. याठिकाणी सुमारे शंभर भाजीविक्रेते आहेत. ही वसुली दहा ते बारा वर्षांपासून सुरू आहे. मात्र सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत.
लवकरच मंडई होणार
वाडिया हॉस्पिटलच्या मागील नाल्यावर बीओटी तत्त्वानुसार दोनशे गाळ्यांचे कॉम्प्लेक्स व मंडई उभारण्यात येणार आहे. या मंडईमुळे भाजीविक्रेत्यांचीही उत्तम सोय होईल. नागरिक रस्त्यावर वाहने लावतात.त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. आरिफ शेख, माजी महापौर
पाण्याची सोय करावी
महापालिका आमच्याकडून दररोज आठ रुपये वसूल करते. पैसे घेऊनसुद्धा महापालिका सोय करून देत नाही. निदान शौचालय आणि पाण्याची सोय करावी. अबुबकर नदाफ, भाजी, फळ विक्रेते