आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दप्तराचा भार : नियम कागदावर अन् ओझे पाठीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शाळकरी मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय होऊन वर्षे झाली. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. "नियम कागदावरच आहे आणि ओझे मात्र पाठीवरच,' अशी स्थिती अद्यापही आहे. आता पुन्हा ओझे कमी करण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. आहे त्याच नियमाचा अंमल झालेला नाही.
प्रत्यक्षात ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे दिसून येत नाही. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या तुलनेत केवळ दहा टक्के दप्तराचे ओझे असावे, असा नियम केला आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांवर भार वाढतच आहे. ‘दिव्य मराठी’ने पाचवी ते दहावीपर्यंतच्या दप्तरचे वजन मोजले. मुलांच्या खांद्यावरील दप्तराचे वजन सरासरी ते किलो आढळून आले आहे. एरवी धडधाकट माणूसही तीन किलोचे वजन सतत पेलताना घामाघूम होतो, मग विद्यार्थ्यांची स्थिती काय होत असेल?
सर्व पाठ्यपुस्तके, वह्या, गृहपाठाच्या वह्या, कंपास पेटी आणि अन्य साहित्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची बाटली, दुपारचा जेवणाचा डबा असे साहित्य त्या दप्तरात कोंबून भरलेले असते. मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करा, त्यांना खेळू, बागडू द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना दिले. दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल, यावर राज्य सरकारांनी शिक्षण तज्ज्ञांची २५ नोव्हेंबर २०१४ रोजी समिती नेमली. या समितीचा अहवाल सरकारला मिळाला. पण, प्रत्यक्षात कार्यवाही काहीही झाली नाही.
शिक्षण कायद्यात उल्लेख
दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली होती. त्यानंतर हे ओझे कमी करण्याची तरतूद २०१० मध्ये लागू झालेल्या शिक्षण हक्क कायद्यातील २९ व्या कलमात करण्यात आली आहे. आरटीईची अद्याप पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. त्यात दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने कोणतीच पावले उचललेली नाहीत.
शाळांनी आग्रह धरू नये
^शाळा हे ज्ञानमंदिर आहे. विक्रीची दुकाने नाहीत. त्यामुळे खासगी व्यवसाय वाढविण्यासाठी मुलांकडून दुसऱ्या इतर पुस्तकांसाठी आग्रह धरू नये. याबाबत ३० ऑगस्ट २०१३ रोजी शासन निर्णयाला धरून परिपत्रक काढले होते. तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.” विष्णूकांबळे, प्रशासनाधिकारी, शिक्षण मंडळ, महापालिका
खासगी शाळांमध्ये जास्त प्रमाण
^जिल्हा परिषदेच्या शाळांपेक्षा खासगी शाळांमध्ये दप्तरांचे ओझे जास्त आहे. त्यामुळे खासगी शाळांना नियमांची पुन्हा एकदा अंमलबजावणीची सूचना देण्यात येईल. कुठे असा प्रकार आढळल्यास कारवाई करण्यात येईल.” राजेंद्रबाबर, शिक्षणाधिकारी
केंद्रीय विद्यालयात नियम
पहिलीते दुसरीपर्यंत एक ते दोन किलो, तिसरी ते चौथीपर्यंत दोन ते तीन किलो, पाचवी ते सातवीपर्यंत तीन ते चार किलो आणि आठवी ते बारावीपर्यंत चार ते सहा किलो अशी दप्तराच्या वजनाची नियमावली केंद्रीय विद्यालयात अंमलात आणली आहे.
रोज तीनच विषय शिकवा
^खासगी शाळा दर्जा टिकविण्यासाठी अनेक उपाययोजना करत असतात. अनुदानित शाळांमधून तसे होतेच असे नाही. दफ्तराचे ओझे कमी करणे तसे शक्य आहे, पण निर्णय घेतला पाहिजे. शाळेच्या सहा दिवसांत एका विषयाची चार अशी सहा विषयांची मिळून २४ वह्या, पुस्तके दप्तरात आणावी लागतात. एक विषय ३५ मिनिटांत शिकवला जातो. त्यातील पहिली पाच-दहा मिनिटे हजेरी, हितगुज यातच जातात. उर्वरित वेळेत फारसे अध्यापन होते असे नाही. त्यामुळे गृहपाठावर भर दिला जातो. हे टाळण्यासाठी दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी एका दिवसात तीन विषय शिकविण्याचे नियोजन शाळांनी केले तर तीन विषयांचेच दफ्तर आणावे लागेल. एक विषय ७० मिनिटांत शिकविला तर विद्यार्थ्यांनाही त्याचे चांगले आकलन होईल. दप्तर कमी होईल.” ए.डी. जोशी, शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ

वजना बाबत नियम

- अभ्यासक्रमातील जोड विषयांसाठी (उदा. इतिहास-नागरिकशास्त्र, भूगोल-अर्थशास्त्र, बीजगणित-भूमिती) एकच वही वापरावी.
- शक्यतो १०० पानांच्या वह्या जोड विषयांसाठी वापराव्यात. प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र वह्या वापराव्यात.
- कार्यानुभव, चित्रकला, समाजसेवा, संगणक, शारीरिक शिक्षण, बालवीर, वीरबाला या वह्या शाळेतच ठेवाव्यात.
- दररोज किमान तीन तासिकांना वह्यांची गरज भासणार नाही, अशा रीतीने शाळेचे वेळापत्रक ठरवावे.
- क्रमिक पुस्तकांशिवाय अन्य पूरक साहित्य (गाइड, मार्गदर्शक, व्यवसायमाला) शाळेत वापरू नयेत. ते साहित्य शाळेत आणण्याचा आग्रह विद्यार्थ्यांना करू नये.
- दप्तर किंवा स्कूलबॅग साधी आणि वजनाने हलकी असावी.
- शाळेत-वर्गात विद्यार्थ्यांसाठी लॉकरची व्यवस्था करावी.
- या सूचनांची सर्व शाळांनी अंमलबजावणी करावी.
ओझ्यामुळे होऊ शकतात आजार
^वयाच्या,उंचीच्या मानाने अधिक ओझे वाहिल्यास मान आणि पाठ, मणक्यावर ताण पडतो. वाढ झपाट्याने होणाऱ्या वयात जास्त ओझे उचलल्यामुळे हाडांची झीज होऊन त्रास होऊ लागतो. उतारवयात पाठीचा मणका, मानेचा त्रास असलेले रुग्ण दिसतात. तशी लक्षणे मुलांमध्ये आढळून येत आहेत. खेळण्या-बागडण्याच्या वयामध्येच मुलांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वरवर हे ओझे फार गंभीर वाटत नसले तरी त्यामुळे मणका, पोटरी, हाडांची झीज होणे, हातात मुंग्या येणे, डोके दुखणे, पाठीला पोक येणे, अशा आजारांसोबत त्यांच्या मज्जारज्जूंवर परिणाम होत आहे. त्याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. मुलाचे वजन तीस किलो असेल तर त्याच्या पाठीवरील दप्तराचे ओझे दोन किलोपेक्षा जास्त नसावे.” डॉ.सचिन कुलकर्णी, अस्थिरोगतज्ज्ञ