आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाधिकाऱ्यांकडून होणार मुख्याध्यापकांवर कारवाई, स्कूल टॅक्सी बंदला नाही प्रतिसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मंगळवारी कारवाई झाल्यानंतर वाहनधारकांनी बुधवारी बंद पुकारला. परंतु त्या बंदचा म्हणावा तसा प्रभाव दिसून आला नाही. दरम्यान, पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी शाळा सुरक्षितता समितीची बैठक घेण्यात आली.

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांनी परिवहन समिती स्थापन करावी. अन्यथा पंधरा दिवसांनंतर मुख्याध्यापकांवर शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत कारवाई करू, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिला. बैठकीला सहाय्यक पोलिस उपायुक्त अश्विनी सानप, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी आदी उपस्थित होते, अशी माहिती श्री. खरमाटे यांनी दिली.

शालेय परिवहन समितीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक हे अध्यक्ष असतात. समितीत पालक संघाचा सदस्य, आरटीओ अधिकारी, त्या हद्दीतील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, वाहनधारक संघटनेचे सदस्य, कंत्राटदार प्रतिनिधी असे सहा सदस्य असतात. परंतु अशी समिती सध्या कुठल्याही शाळेत असल्याचे दिसून येत नाही. बेकायदा वाहनांवरील कारवाईचा कायदा चार वर्षापूर्वीच झाला. त्याची आत्तापर्यंत कठोर अंमलबजावणी झाली नाही म्हणून आता करायची नाही का, असा प्रश्न आरटीओ खरमाटे वाहनचालकांना केला.

आम्हाला बारा सीटची परवानगी द्यावी. प्रवासी क्षमता आणि भाडेदर यांची निश्चित करण्यात यावी.शाळेची समिती बैठकीत बोलवत नाही. शाळेच्या वाहनांमध्ये आणि आमच्या वाहनांच्या भाडेदरात फरक आहे.शाळांच्या मालकीचीही काही वाहने आहेत, त्यांची कधीही तपासणी होत नाही.

शालेय परिवहन समितीची कामे
विद्यार्थीवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, परवाना, वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, लायसन्स, अग्निशामक आणि प्रथमोपचार पेटी आदी तपासणी करणे. यात अनियमितता आढळल्यास आरटीओ अधिकाऱ्यास कळवणे. तसेच प्रत्येक तीन महिन्यांत बैठक घेऊन अहवाल घेणे.

आजपासून बस सुरू
ज्यावाहनचालकांकडे सर्व कागदपत्रे असतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही, असे आश्वासन दिल्यामुळे गुरुवारपासून स्कूल बस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीनिवासजमदाडे, अध्यक्ष,नवनिर्माण विद्यार्थी वाहतूक संघटना

२४रिक्षांवर कारवाई
बुधवारीशहरातील २४ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई यापुढेही सुरूच असेल, अशी माहिती आटीओ बजरंग खरमाटे यांनी दिली.

वाहनधारकांसाठी असे आहेत नियम
*विद्यार्थ्यांचीवाहतूक करणार असेल तर त्या वाहनधारकाकडे वाहन परवाना, स्कूलबसचा वेगळा परवाना आवश्यक.
* वाहन पंधरा वर्षापेक्षा जुने नसावे, वाहनाचा रंग पिवळा असावा, विटकरी पट्यावर शाळेचे नाव असावे, विद्यार्थ्यांची बॅग ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा असावी.
* विद्यार्थ्यांचे हात येऊ नये म्हणून खिडक्यांना जाळी बसवण्यात यावी. वाहनाच्या पायरीची उंची २२ सेंटीमीटरपेक्षा अिधक असता कामा नये.
* वाहनात फक्त मुली असतील तर वाहनात स्त्री सहवर्ती असणे गरजेचे. वाहनातील सर्व विद्यार्थ्यांची यादी असणे आवश्यकच.
* यादीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, पालकांचे मोबाइल नंबर, रक्तगट आदी माहिती आवश्यक.

आरटीओंचा वाहनधारकांना दिलासा
कोणावरहीअन्याय होणार नाही. शाळांच्या वाहनांचीही तपासणी होईल. बेकायदा वाहनांवर कारवाई होईल. तसेच शाळेच्या समितीत सहभागी करून घेण्याचे विनंतीपत्र वाहनधारकांनी शाळेत द्यावे त्याची फोटोप्रत मला द्यावी, पुढे काय करायचे ते मी पाहतो, असा दिलासा खरमाटे यांनी वाहनधारकांना दिला.
मोजक्याच वाहनाचालंकानी बंद पाळल्यामुळे कुठेही बंदचे पडसाद दिसले नाहीत आणि विद्यार्थ्यांची गैरसोय झाली नाही.