आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scientific Approach, Latest News In Divya Marathi

समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा- अशोक सोनवणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-विज्ञान प्रशिक्षण शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांना खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्याचा समाजासाठी कसा वापर करता येईल, याबाबत विद्यार्थ्यांनी विचार करावा. प्रशिक्षण शिबिरातून मिळालेल्या ज्ञानाच्या साहाय्याने समाजातील लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक सोनवणे यांनी केले. न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये 21 मार्चला आयोजित जिल्हा विज्ञान मंच प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
राज्य विज्ञान संस्था, नागपूर, शिक्षण उपसंचालक कार्यालय, अमरावती, शिक्षणाधिकारी (माध्यामिक) कार्यालय, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, अकोला एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सोनवणे म्हणाले, की सध्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विज्ञानाचा कसा वापर करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. वैज्ञानिक तत्त्व नुसते जाणून घ्यायचे नाहीत, तर विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करायचा आहे. त्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर आहे. अकोला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब मांडवगणे म्हणाले, की शैक्षणिक सत्रात होणार्‍या विविध विज्ञान प्रदर्शनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढत असते. त्याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. विज्ञानातील प्रयोगांचे प्रशिक्षण घेत असताना त्यांचा मुळापासून अभ्यास झाला पाहिजे.
जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड यांनी विद्यार्थी विज्ञानाच्या साहाय्याने उंच भरारी घेऊ शकतो, असे मत व्यक्त केले. विज्ञान क्षेत्रात खर्‍या अर्थाने विद्यार्थी घडवण्याचे काम शिबिरातून होत असते. विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि पर्यावरण अशा दोन्ही घटकांचा अभ्यास करावा, असे ते म्हणाले. शिबिराचे समन्वयक रवींद्र भास्कर यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत बांगर यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक अरुण शेगोकार यांनी केले. या वेळी न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्तात्रय कदम, दानापूर येथील जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण सावरकर यांच्यासह अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.