आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seat Issue For Solapur Vidhansabha In Bjp Sena And Rpi

महायुतीत रस्सीखेच : भाजपला हव्यात 8 जागा; सेना जुन्या फॉर्म्युल्यावर ठाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महायुतीत कोणी किती जागा लढवाव्यात हा वाद सोलापुरातही तिढा निर्माण करणारा ठरू लागला आहे. भाजपने विधानसभेच्या आठ जागांची मागणी केली आहे, तर शिवसेनेने सध्या असलेला फॉर्म्युला कायम असावा ही भूमिका घेतली आहे. जागा वाढवून मिळाव्यात अशी आक्रमक भूमिका घेणा-या महायुतीतील स्थानिक नेत्यांनी स्वबळावर लढण्याबाबत मात्र मवाळ भूमिका घेतल्याचे दिसते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती करून मोठे यश मिळवल्यानंतर आता विधानसभेतही भगवा फडकण्याची शक्यता गृहित धरून भाजप-सेनेत आतापासूनच मुख्यमंत्री आमचाच, जागाही जास्त आमच्याच यासाठी बांधणी सुरू केली आहे. त्यातच भाजपच्या काही नेत्यांनी भाजपची युतीमध्ये घुसमट होत असून स्वबळावरच लढले पाहिजे, अशी भूमिका जाहीरपणे मांडली आहे. राज्यातील नेत्यांची ही भूमिका वरिष्ठ नेत्यांकडून दुुर्लक्षित केल्याचे दाखवले जात असले तरी ही धुसफूस जागा वाटपावरून वाढणार अशीच चिन्हे आहेत.
सोलापूर जिल्ह्यात भाजप-शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्याने सेना-भाजप या पक्षातील बळ वाढले आहे. त्याचा लाभ विधानसभेतही मिळेल असा अंदाज असल्याने प्रत्येक विधानसभा मतदार संघात भाजप आणि शिवसेनेनेही आपली बांधणी सुरू केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेने सांगोला, बार्शी येथील काँग्रेसच्या नेत्यांना सेनेत घेऊन त्याचा प्रत्यय दिला आहे. तर शिवसेनेच्या काही जागांवर भाजपच्या नेत्यांचा डोळा आहे. जिल्ह्यात आठ जागा मिळाव्यात, असा आग्रह भाजपने धरला आहे. शिवसेनेने बार्शी, सांगोला, पंढरपूर येथील उमेदवार निश्चित केल्याने भाजपसमोर प्रश्न निर्माण झाले आहेत. तर भारतीय जनता पक्षाने दक्षिण सोलापूर, शहर मध्यवरही डोळा ठेवला आहे. मोहोळ मतदारसंघही मागण्यास सुरुवात केली आहे. तर शिवसेनेने सध्याचा फॉर्म्युला बदलू नये, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

शिवसेना - भाजपच्या रस्सीखेचेत मित्रपक्ष गेले हरवून
महायुतीमध्ये भाजप-सेनेबरोबर रिपाइं, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम आदी पक्ष, संघटनांचा समावेश आहे. भाजप-सेना दोघेच जागा वाटपाबाबत भांडत बसल्याने मित्र असलेल्या अन्य पक्षांची पंचाईत झाली आहे. सोलापुरात रिपाइं, स्वाभिमानी, रासप संघटना जागा लढवू इच्छित आहे. त्यांना कुठे जागा मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजप-सेनेच्या भांडणात मित्रपक्ष हरवून बसल्याचेच चित्र सध्या दिसते आहे.

ताकद वाढल्याने आता भाजप राहणार मोठ्या भावाच्या भूमिकेत
- आजवर राज्यात युतीत शिवसेनेने मोठ्या भावाची भूमिका बजावली, आता भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजपने मोठ्या भावाची भूमिका बजावावी, असे आम्ही श्रेष्ठींना सांगितले आहे. सोलापुरात आठ जागा मिळाव्यात ही मागणी आहे. गेल्यावेळी भाजपने तीन जागा लढवल्या. त्यातील दोन जागा जिंकल्या तर शिवसेनेने आठ जागा लढवल्या, त्यातील सहा, सात जागांवर अनामत जप्त झाली. नरेंद्र मोदींमुळे भाजपला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे यावेळी भाजपला आठ जागा मिळाव्यात, तीन जागा शिवसेनेने लढवाव्यात असा प्रस्ताव आम्ही भाजपच्या नेत्यांकडे दिला आहे. स्वबळावर लढण्याबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील. महायुती तुटणार नाही असे वाटते. शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष, भाजप

भाजपने विनाकारण महायुतीत अडचण निर्माण करू नये
- सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शहर मध्य, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा-पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा, बार्शी या जागांवर लढणार आहे. याआधी ठरल्याप्रमाणे युतीच्या जागा वाटपात या जागा आमच्याकडे आहेत. तर शहर उत्तर, अक्कलकोट आणि माळशिरस या जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेत. हाच फॉर्म्युला यापुढील काळातही कायम राहावा, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे भाजपने जागावाटपावरून विनाकारण महायुतीमध्ये अडचण होईल अशी कोणतीही भूमिका घेऊ नये. जागा वाटपात चुकीचा आग्रह धरू नये. भाजपने स्वबळावर लढण्याची भाषा का करावी, हे समजत नाही. सर्वप्रथम जनतेच्या हिताचा विचार करावा. याबाबत उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील. लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना