आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवानिवृत्तीचे पैसे मिळवून देतो म्हणून ज्येष्ठ नागरिकाला गंडविले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ट्रेझरीकडून आलोय. पेन्शनर लोकांची थकबाकी जमा झाली आहे. मी तुमच्या मुलाचा मित्र आहे. तुमच्या नावे 3 लाख रुपये आहेत. तुम्ही 33 हजार रुपये देताच तुम्हास पावती आणून देतो, असे सांगून 33 हजार रुपये घेऊन पोबारा केला. ही घटना 7 सप्टेंबर रोजी घडली होती. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोमवारी सदर बझार पोलिसात सुधाकर सुदामे (मिहीर आपर्टमेंट, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. दुसर्‍या एका घटनेत 70 विडी कामगार महिलांची फंडाची रक्कम वाढवून देतो म्हणून फसवणूक केल्याची तक्रार जेल रोड पोलिसात झाली आहे.

सुधाकर सुदामे व त्यांची पत्नी किराणा साहित्य खरेदी करून रिक्षातून घराजवळ आले होते. त्यावेळी पस्तीशीतील एक तरुण समोर आला. मी तुमच्या मुलाचा मित्र आहे. मुंबईत नोकरीस असताना मीही त्याच्यासोबत काम करीत होतो. आता सोलापुरात राहत असून ट्रेझरीकडून आलोय. पेन्शनर लोकांचे थकबाकीचे चेक आले आहेत. त्यात तुमच्या नावे तीन लाख रुपये जमा आहेत. त्यासाठी 33 हजार रुपये खर्च असल्याचे सांगितले. विश्वासाने त्याला पैसे दिले. परंतु पावती आणून देतो म्हणून गेलेला तो तरुण आलाच नाही. वर्षभरापूर्वी एका तरुणाने अशाच पध्दतीने थाप मारून ज्येष्ठ नागरिकांना गंडविले होते. त्याला सदर बझार पोलिसांनी जेरबंद केले होते. या पध्दतीने गुन्हा करणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलित करून चौकशी सुरू केली असल्याचे फौजदार बी. जी. कोळेकर यांनी सांगितले.

70 विडी कामगार महिलांची फसवणूक
60 ते 70 विडी कामगार महिलांना ग्रॅज्युएटी व भविष्य निर्वाह निधीची रककम जादा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेऊन फसवणूक केली. त्यामुळे दोघांविरुद्ध 5 हजार 600 रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे. शकुंतला दशरथ श्रीपती (रा. महात्मा झोपडपट्टी, सोलापूर) यांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना मागील तीन वर्षांपूर्वी ठाकूर सावदेकर ब्रँच क्रमांक 8, 13 साखरपेठ येथे घडली आहे. अंबादास कोळी (रा. ठाकूर सावदेकर विडी कारखाना), विजय पाटील (रा. कस्तुरीनगर, महिला विडी कामगार संघटना) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शकुंतला श्रीपती व अन्य विडी कामगार महिलांना ग्रॅज्युएटी व भविष्य निवार्ह निधीत जादा पैसे मिळवून देतो, असे सांगत पाच हजार सहाशे रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

सीमकार्डसाठी बनावट कागदपत्रे वापरले; दोन गुन्हे दाखल
मोबाइल सीमकार्ड घेण्यासाठी वंदना धर्मण्णा कनकी (रा. नवनाथनगर, एमआयडीसी) यांच्या नावाची बनावट कागदपत्रे तयार करून ती स्थानिक विक्रेत्यांना दिल्याप्रकरणी एका व्यक्तीवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल आहे. कनकी यांनी फिर्याद दिली आहे. धनंजय राजेंद्र गोरंटी (रा. गोदूताई विडी घरकुल) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 17 फेब्रुवारी 2012 रोजी रूद्राली हायटेक टुल्स कंपनीत हा प्रकार घडला. विविध मोबाइल कंपन्यांना कागदपत्रे तयार करून दिली. त्याची तपासणी न करता गोरंटीला सीमकार्ड दिले. कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुसर्‍या घटनेत दिनेश देवरे (वय 29, निराळेवस्ती) यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. सिध्दराम चलगेरी (रा. स्वागतनगर), गोपाल चिलका (रा. एमआयडीसी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मोबाइल कंपनीचे सीमकार्ड घेण्यासाठी चलगेरी याने बनावट कागदपत्रे तयार करून ती चिलकाला वितरीत करून कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.