आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टल कॉलनीमधील ज्येष्ठ नागरिक झाले त्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विकासनगर येथील पोस्टल कॉलनी येथे ड्रेनेजलाइन तुंबून ते घाण पाणी येथील प्रत्येक घरात शिरले आहे. ही स्थिती अकरा वर्षांपासून असून, याकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. तीन दिवसांपासून घरात पाणी शिरले असून, त्याचा निचरा करण्यासाठी एकही कर्मचारी किंवा अधिकारी येथे फिरकला नाही. विमा हॉस्पिटलच्या मागून पोस्टल कॉलनीमधून जी ड्रेनेजलाइन गेलेली आहे ती लाइन मागील धोबीघाटच्या येथे निघते. त्या ठिकाणी रेल्वे पुलाच्या परिसरात 25 फूट खोल एक ड्रेनेजचे उघडे चेंबर आहे.


ही लाइन बाराही महिने वारंवार तुंबते. लाइन तुंबल्यावर महापालिकेचे कर्मचारी तात्पुरती सफाई करतात. पावसाळ्यात ड्रेनेजचे पाणी घरात शिरते. रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्याच्या दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. ड्रेनेजलाइनची समस्या सोडवण्यासाठी येथील नागरिक गेल्या 11 वर्षांपासून महापालिकेशी पत्रव्यवहार करीत आहेत. तरीही महापालिकेने अद्याप या समस्येकडे गांभीर्याने पाहिले नाही.


मंत्रालयातील दोन सचिवांचे येथे घर
पोस्टल कॉलनी येथे मंत्रालयातील विविध विभागांचे दोन सचिवांचे मूळ घर आहे. आनंद कुलकर्णी आणि मिलिंद म्हैसकर अशी या दोन सचिवांची नावे आहेत. सोलापुरात आले तेव्हा या दोन्ही सचिवांनी या समस्येबाबत महापालिकेशी बोलणी केली होती आणि समस्या सोडवण्यासंदर्भात सांगितले होते, अशी माहिती या भागातील नागरिकांनी यावेळी दिली. येथे माजी खासदार सुभाष देशमुख यांचाही बंगला आहे.


ड्रेनेजचे पाणी घरात
घरासमोर नेहमी ड्रेनेजचे पाणी साचते. पावसाळ्यात हेच पाणी आमच्या घरात शिरते. बाहेर येजा करायला त्रास होतो. साधे दूध, न्यूज पेपर आणि भाजीपाला विकणारे सुद्धा येथे फिरकत नाही. जयंत म्हैसकर, नागरिक


महापालिकेचे दुर्लक्ष
ड्रेनेजच्या समस्येबाबत महापालिकेला 11 वर्षांपासून पत्रव्यवहार करत आहे. महापालिकेने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. रस्त्यावरील दिवे एक महिनाभरापासून बंद आहेत. आर. एन. फडके, सचिव,


चेंबर धोकादायक, महापालिकेला माहिती
विजापूर रोड रेल्वे पुलाच्या परिसरात एक 25 फूट खोल चेंबर आहे. तो चेंबर इतका धोकादायक आहे की त्यामध्ये कोण पडला तरी दिसणार नाही. याबाबत महापालिकेशी वारंवार पत्रव्यवहार केला. फिरदोस पटेल, नगरसेविका