सोलापूर- वकिलीक्षेत्रात यश मिळवायचे असेल तर खटल्यातील बारीकसारीक गोष्टींवर तर्कवितर्क करून पाहावा. तसेच स्वत:चे लॉजिक वापरून केस लढावी, असे मत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. एका समारंभासाठी ते येथे आले होते. सोलापूर बार असोसिएशन कार्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली, यावेळी ते बोलत होते.
अॅड. निकम पुढे म्हणाले की, ज्युनिअर वकिलांचा काम करताना आत्मविश्वास उत्साह वाढावा यासाठी वरिष्ठांनी ठरावीक स्टायफंड त्यांना द्यावा. बार असोसिएशनमध्ये एकता असावी. सरकारी वकिली करताना भरपूर जबाबदाऱ्या असतात, पण शांतचित्ताने काम करावे. वकिली व्यवसायात
आपण शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो. पक्षकाराला खोटे आश्वासन देऊ नये. तसेच अशिलाशी प्रामाणिक असावे. काही खटल्यात अपयश आले तर न्यायाधीशाविरुद्ध चुकीचे वक्तव्य करू नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
बारचे अध्यक्ष अॅड. आप्पाराव शिंदे यांनी स्वागत केले. अॅड. मिलिंद थोबडे यांनी परिचय करून दिला. प्रास्ताविक अॅड. मोहन यल्ला यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. अविनाश बिराजदार यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष दीपक केसकर, सरकारी वकील पी. एस. शेंडे, अॅड. सर्वश्री जे. डी. सरवदे, सुरेश पाटील, आय. ए. शेख, रियाज शेख, रवी पाटील, अॅड. एम. बी. सोलनकर, विनोद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.यावेळी अॅड. निकम यांचा सत्कार करण्यात आला.