आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदूराष्ट्र करण्याची इच्छा म्हणजे देशाच्या संविधानाचा अपमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- स्वातंत्र्य,समता, बंधुता, समाजवाद आणि लोकशाही या मूल्यांवर देश चालतो, ही बाब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना माहीत नाही काय? हिंदूराष्ट्र करण्याची त्यांची इच्छा म्हणजे संविधानाचा अपमान आहे, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव (पुणे) यांनी येथे व्यक्त केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आम्ही होतो. तुम्ही (संघ) नव्हता. पण तुमची वक्तव्ये ऐकून कशाला स्वातंत्र्यलढ्यात पडलो, असा विचार मनात येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
भाई छन्नुसिंह चंदेले स्मृती केंद्राच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. थोर स्वातंत्र्यसेनानी भाई छन्नुसिंह चेंदेले यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजिला होता. ‘समता प्रत्यक्षात येईल कशी?’ हा व्याख्यानाचा विषय होता. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात हा कार्यक्रम झाला. चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. आढाव म्हणाले, “नेपाळने घटना दुरुस्ती करून ‘हिंदूराष्ट्र’ हे ब्रीदच काढून टाकले. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका ख्रिश्चन राष्ट्रे आहेत काय? बिलकुल नाही. लोकशाहीवाद त्यांनी स्वीकारला. पण देशाच्या नव्या राज्यकर्त्यांनी आपल्यापुढे जबरदस्त आव्हान उभे केले आहे. देशापुढे भारताचा अजेंडा असेल की संघाचा? असा प्रश्न उभा केला. कॉर्पोरेट भांडवलशाहीचे आव्हान निर्माण केले. ज्यामुळे श्रमकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला. खेड्यातील कोटी ज्येष्ठ मंडळींना पेन्शन नाही. 45 कोटी असंघटित कामगारांना भवितव्य नाही. त्यांचे प्रश्न लोकसभेत येतच नाहीत. त्यामुळे सामाजिक विषमतेसह आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेला आहे.”

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई एस. एम. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. स्मृती केंद्राचे सचिव रवींद्र मोकाशी यांनी प्रास्ताविक केले. ए. आय. अलीम, मल्लिनाथ वडजे मंचावर होते.
डॉ. आढाव म्हणतात...
माणुसकीशी फारकत घेतलेले देश टिकलेले नाहीत.
हिंसात्मक लोकशाहीचे कोणीच समर्थन करत नाही.
जातीव्यवस्थेच्या बीमोडाशिवाय समता नाहीच.
गीता, कुराणापेक्षा राज्यघटना पठण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
शिक्षणात जाती-धर्माची चिकित्सा करायलाच हवी.
बहुजन अजूनही गुलामगिरी सोडायला तयार नाहीत.
भाई छन्नुसिंह चंदेले स्मृती केंद्राच्या वतीने डॉ. बाबा आढाव यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी मंचावर (डावीकडून) ए. आय. अलीम, डॉ. आढाव, भाई एस. एम. पाटील, मल्लिनाथ वडजे रवींद्र मोकाशी.