आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Separat Gulbarga Railway Division No , Say Railway Minister

स्वातंत्र गुलबर्गा रेल्वे विभागाला रेल्वे मंत्र्यांनी दिली बगल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रेल्वेच्या तीनही सरव्यवस्थापकांनी गुलबर्गा विभाग बनवण्याविषयी दिलेल्या प्रतिकूल अहवालामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खर्गे यांना आपला आग्रह सोडावा लागला. गुलबर्गा येथील सभेत गुलबग्र्याला रेल्वे विभागाचा दर्जा देण्यासंबंधी घोषणा करण्याचे संकेत त्यांनी सोमवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिले होते.

मंगळवारी गुलबर्गा येथील एस. एम. पंडित रंगमंचाच्या सभागृहात श्री खर्गे यांनी रेल्वेच्या विविध कामांची घोषणा केली. गुलबर्गा विभाग निमिर्ती विषयाला त्यांनी बगल दिली. काही दिवसांपूर्वी त्यांनी मध्य रेल्वे, मध्य दक्षिण रेल्वे व दक्षिण पश्चिम रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना गुलबर्गा विभाग निर्मितीबद्दल आपापली मते मांडण्यास सांगितले होते. तीनही झोनच्या सरव्यवस्थापकांनी आपला प्रतिकूल अहवाल दिला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. यामुळे सोलापूर विभागाच्या विभाजनाचा प्रयत्न लांबणीवर पडला आहे. सोलापुरातील संघटनांनी याचे स्वागत केले.


सभेत काय म्हणाले श्री. खर्गे
कर्नाटकातून जाणार्‍या रेल्वेचे कामकाज तीन भागांत विभागले आहे. यात मध्य रेल्वे, दक्षिण मध्य व दक्षिण पश्चिम रेल्वे झोनचा समावेश आहे. कर्नाटकातील रेल्वे कर्मचार्‍यांना कामासाठी कधी मुंबई, कधी हुबळी तर कधी सिकंदराबादला हेलपाटे मारावे लागतात. त्यांचा हा त्रास कमी व्हावा असे मला वाटते. भविष्यात या दृष्टीने मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. मात्र, नव्या विभागाचा उल्लेख टाळला.


सोलापूर विभागाच्या विभाजनास आमचा पहिल्यापासून विरोध होता. प्रत्येक रेल्वे मंत्र्यांनी जर आपापल्या गावात नव्या विभागाची घोषणा केली तर अगोदरच आर्थिक अडचणीत आलेल्या रेल्वेला आणखी फटका बसू शकतो. केतन शहा, मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य


विभाग बनविण्यास किमान 300 किमीचे अंतर दोन विभागात असणे गरजेचे आहे. गुलबग्र्याच्या बाबतीत ते नाही. यापूर्वीच दौंडपासूनचा भाग जोडून पुणे विभाग तयार करण्यात आला. पुणे विभागाचे बस्तान अजून बसलेले नाही. त्यात गुलबग्र्याची भर कशाला. सुनील लोखंडे, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन सोलापूर


सोलापूर विभागाचे विभाजन होणार नाही ही आनंदाची बातमी आहे. यामुळे सोलापूर रेल्वे स्थानकाचा व विभागाचा विकास होईल. गुलबर्गा विभाग झाला असता त्याचा विपरीत परिणाम सोलापूर विभागाच्या उत्पन्नावर झाला असता. हर्षल कोठारी, विभागीय सल्लागार समिती सदस्य.


गुलबर्गा विभाग बनविणे तांत्रिकदृष्ट्या अवघड असताना रेल्वे मंत्री ते करण्याचा प्रयत्न करत होते. कर्नाटक राज्यात यापूर्वीच भरपूर विभाग असताना रेल्वे मंत्र्यांनी गुलबर्गा विभागाचा हट्ट धरणे हे चुकीचेच आहे. उपेन्द्र ठाकर, रेल्वे स्थानक सल्लागार समिती सदस्य.


यापूर्वी सुध्दा जाफर शरिफ यांनी गुलबर्गा विभाग बनविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते अशक्य असल्याने त्यांनी तो प्रयत्न सोडला. गुलबर्गा विभाग होणे अवघड आहे. केवळ विभाग बनवून चालणार नाही तर त्याच्या उत्पन्नाच्या बाबी देखील लक्षात घेतल्या पाहिजे. व्ही. एच. बागेवाडी, मंडळ सचिव, सेन्ट्रल रेल्वे मजदूर युनियन.
गुलबर्गा विभाग बनविणे हा पोरकटपणा ठरला असता. गुलबर्गा विभाग झाला असता, त्याचा सोलापूरच्या विकास कामांवर नकारात्मक परिणाम झाला असता. संजय पाटील, उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा प्रवासी संघ