आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेप्टिक टँकच्या स्वच्छतेसाठी मोजावे लागताहेत अतिरिक्त पैसे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - घरातील सेप्टिक टँक भरल्यानंतर तो साफ करण्यासाठी महापालिकेकडून 400 रुपये शुल्क आकारले जाते. रीतसर शुल्क भरले तर वेटिंगच्या सबबीखाली टँक साफ करणारे वाहन दहा ते पंधरा दिवस फिरकत नाही. मात्र, वाहनावरील कर्मचार्‍यांच्या हातावर 600 रुपये टेकवले की तासाभरात सफाईचे काम होते. या तत्पर परंतु अनधिकृत सेवेची सध्या चलती आहे. नागरिक गैरमार्गाने टँक साफ करून घेत आहेत. 200 रुपये अतिरिक्त दिल्यास तासात गाडी दारात हजर होते, त्यामुळे पैसे अतिरिक्त गेलेले बरे पण काम वेळेवर होते ना? अशी भावना नागरिकांची झाली आहे.
अवैधरीत्या रोज साधारण पाच सेप्टिक टँकची सफाई केली जाते. दोन्ही वाहनांवरील मिळून दररोज सहा हजार रुपयांची अतिरिक्त कमाई सुरू आहे. ती रक्कम मनपाच्या तिजोरीत जमाच होत नाही. याकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे की ते अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत, हे कळायला मार्ग नाही.
नागरिकांचाही नाइलाज होतो - हद्दवाढ भागात अपार्टमेंट बांधकाम करताना बिल्डर सेप्टिक टँक बांधतात. एका घरात पाच व्यक्तीप्रमाणे चार बाय पाच या आकाराचे टँक बांधल्यास तीन वर्षांतून एकदा ती भरते. त्यांची साफाई करण्यासाठी महापालिकेकडे दोन वाहने आहेत. याशिवाय शहरात खासगी वाहने नाहीत. त्यामुळे टँक साफ करण्यासाठी मिळकतदारांना महापालिकेकडे धाव घ्यावी लागते. टँक भरल्यावर टॉयलेटमध्ये तुंबत असल्याने तो साफ करणे आवश्यक असते. त्यासाठी नागरिकांना तत्काळ सेवा देणे आवश्यक असताना दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने अवैध मार्गाचा अवलंब करावा लागतो.
80 लाखांची तहान 40 हजारांवर - हद्दवाढ भागात 92 हजार मिळकती आहेत. त्यापैकी वर्षाला सुमारे 20 ते 22 हजार मिळकतीमधील टँक भरतील असा अंदाज आहे. ते साफ केल्यास महापालिकेस 80 लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित असताना ती 40 हजारांवर आली आहे.
नागरिकांना दुहेरी भुर्दंड - हद्दवाढ भागात ड्रेनेजलाइन नसताना मैलामिर्शित सफाईपोटी महापालिकेने चालू बिलात 415 रुपये यूजर चार्ज सुरू केले. तसे बिले वाटले. एकीकडे यूजर चार्ज घेत असताना दुसरीकडे मात्र सेप्टिक टँक साफ करण्यासाठी मनपा 400 रुपये आकारणी करते. नागरिकांना दुहेरी भुर्दंड सहन करावा लागत आहे.
लक्षवेधी घेतो - हद्दवाढ भागातील सेप्टिक टँक साफ करण्यासाठी मिळकतदारांकडून अतिरिक्त पैसे घेतले जातात, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यानुसार माहिती घेऊन महापालिका सभागृहात लक्षवेधी मांडणार आहे.’’ शैलेंद्र आमणगी, नगरसेवक
शुक्रवारी असा झाला संवाद
स्थळ : रुबीनगर, जुळे सोलापूर.
वेळ : सकाळी 9 वाजून 45 मिनिटे.
प्रश्न : आमच्या घरात सेप्टिक टँक भरला आहे.
उत्तर : मोबाइल नंबर द्या.
प्रश्न : किती वेळात गाडी येईल ?
उत्तर : तासात येतो.
प्रश्न : पैसे किती ?
उत्तर : 600 रुपये.
प्रश्न : पावती मिळेल का ?
उत्तर : पावती नाही, मग इंद्रभुवनात जा, पावती करा आणि वेटिंगनुसार नंबर आल्यावर येतो.
प्रश्न : घरात वास येतो.
उत्तर : त्यासाठी पैसे द्या.
थांबा साहेबांना फोन करतो, असे म्हणताच चालकाने तेथून जाणे पसंद केले.